ठाणे : थेट सरपंच निवडून देणा-या पहिल्याच निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपामध्येच सर्वाधिक चुरस दिसून आली. पुढील महिन्यात होणा-या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी या निवडणुकीतील कल महत्त्वाचा मानला जात होता. पण तो कोणत्याही एकाच पक्षाच्या बाजूने नाही.या निकालांनुसार भिवंडी तालुक्यात अपेक्षेप्रमाणे भाजपाने, तर कल्याणमध्ये शिवसनेने बाजी मारली. मुरबाडमध्ये परिसरानुसार भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात सरपंचपदे विखुरली गेली. शहापूरमध्ये शिवसेनेने एक पद जिंकले, तर दुसºयावर शिवसेना-भाजपा दोघांनीही दावा सांगितला आहे.भिवंडीतील १४ सरपंचपदांपैकी आठ भाजपाने ताब्यात राखली. राज्यात कोठेही भाजपाशी युती करणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका असली, तरी या तालुक्यातील एक जागा युतीने लढवून जिंकण्यात आली; तर शिवसेना चार पदांवर विजयी झाली. शहापूर तालुक्यात पाचपैकी तीन पदांसाठी निवडणूक झाली. पण त्यातील बाभळे या ठिकाणी कोणाचाच अर्ज न आल्याने ते रिक्त राहिले. कानवे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा सरपंच निवडून आला, तर चिखलगावात बिनविरोध निवडून आलेल्या पिंकी पवार या आमच्याच पक्षाच्या असल्याचा दावा शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी केला आहे. मुरबाड तालुक्यातील १३ पैकी चार सरपरंचपदे भाजपाच्या पदरात पडली आहेत, तर शिवसेना-राष्ट्रवादीने उरलेल्या नऊ पदांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे या तालुक्यात मतदारांचा संमिश्र कौल दिसून आला.कल्याण तालुक्यातही नऊपैकी एक पद अर्ज न आल्याने रिक्त राहिले. उरलेल्यांपैकी पाच पदांवर शिवसेनेने विजय मिळवला. दोन जागा भाजपाने, तर एक अपक्षाने जिंकली. या चारही तालुक्यांत काँग्रेसला एकही पद न मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे.नवी समीकरणांची जुळणी : दिवाळीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असे मानले जाते. त्यासाठी भिवंडी, शहापूर, मुरबाड तालुक्यावर सर्वांचे लक्ष आहे. त्यातील भिवंडीत भाजपाने बाजी मारली, तर शिवसेना दुसºया स्थानावर आहे.ंमुरबाडमध्ये भाजपाची स्थिती चांगली असल्याचे दिसून आले. पण तशीच स्थिती शिवसेना, राष्ट्रवादीचीही आहे. शहापूरमध्ये तुरळक सरपंचपंदे असल्याने त्या तालुक्याचा कल स्पष्ट होऊ शकलेला नाही.ंकल्याण तालुक्याने मात्र शिवसेनेला कौल दिल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्रामपंचायत आणि सरपंचपदाच्या निकालानंतर जिल्हा परिषदेसाठी नव्या समीकरणांची जुळणी सुरू होईल, असे चित्र आहे.
ठाणे जिल्ह्यात सरपंचपदातही शिवसेना-भाजपात चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 6:27 AM