ठाणे- दिव्यात शनिवारी लसमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. एकाच दिवशी तब्बल 10 हजार जणांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे हजेरी लावणार आहेत. परंतु, आता याच लसमहोतस्वाच्या मुद्यावरून भाजपने आक्षेप घेत शिवसेनेने स्वत:ची जाहीरातबाजी करून पंतप्रधान मोदी यांना डावलले असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे लसीकरणाच्या दिवशी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. यामुळे आता दिव्यात पाणी, डम्पींग पाठोपाठ आता लस महोत्सवातही शिवसेना विरुध्द भाजप राजकारण तापणार असल्याचे दिसत आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून गांधी जयंत्तीचे औचित्य साधून दिव्यात शनिवारी लस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सांयकाळी पाच वाजेर्पयत हा महोत्सव असणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. त्या अनुषंगाने दिव्यात शिवसेनेच्या वतीने बॅनर लावण्यात आले असून त्यावर शिवसेनेच्याच नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. वास्तविक पाहता, लसीकरण मोहीम वेगाने पुढे जावी, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे. त्यातही त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच लस उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो यावर असणे अपेक्षित होते, असे मत आता दिवा भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.
यामुळे याचा निषेध करीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखविले जाणार असल्याचा इशारादेखील भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे आता दिव्यात पाणी, डम्पींग पाठोपाठ लसमहोत्सवाचे राजकारण केले जात असल्याचेच यातून दिसू लागले आहे. किंबहुना या महोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना विरुध्द भाजप असा सामना रंगणार असल्याचेच दिसत आहे.
पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र आणि नामोल्लेख जाणून बुजून टाळण्यात आल्याने सत्ताधारी शिवसेनेचा निषेध व्यक्त करणार आहोत. तसेच पालकमंत्र्यांना याच माध्यमातून काळे झेंडे दाखविणार आहोत.-निलेश पाटील - उपाध्यक्ष, भाजप - ठाणे
दिवेकरांचे लसीकरण होऊ नये, म्हणून वाद करून या मोहिमेत आडकाठी करायची असेल आणि संघर्ष घडवायचा असेल तर त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही कोणाच्या धमक्यांना भीक घालत नाही. ते लसीकरण मोहीम राबवित असतात, तेव्हा ते मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांचा फोटा लावतात का? आम्ही प्रोटोकॉल पाळला आहे, महापालिकेच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जात आहे. आम्ही केवळ मंडप आणि इतर सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. त्यामुळे यात आडवे याला तर जशाच तसे उत्तर देऊ.-रमाकांत मढवी - स्थानिक नगरसेवक, तथा माजी उपमहापौर - ठामपा