सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात अनेक समस्या निर्माण झाले असताना दुसरीकडे सोशल मीडियावरशिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी विरुद्ध भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला. यामुळे एकच खळबळ उडाली. सहा महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले की काय?. असा प्रश्न निर्माण झाला.
उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना मित्र पक्षाची सत्ता तर भाजपचे स्पष्ट बहुमत महापालिकेत असूनही ते पक्षातील ओमी टीम समर्थक बंडखोर नगरसेवकामुळे विरोधी बाकावर आहेत. महापालिका निवडणूक सहा ते सात महिन्यावर येऊन ठेपल्याने शहर विकासा बाबत भाजप-शिवसेना आमनेसामने उभे टाकल्याचे चित्र आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसा पासून शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी व भाजपचे वरिष्ठ नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यात अवैध बांधकामे, पालिकेतील फाईल चोरी आदी बाबत आरोप प्रत्यारोपचा सामना सोशल मीडियावर रंगला. दोघेही एकमेकाला आवाहन प्रतिआवाहन देत असल्याने, शहरात चालले तरी काय? असा प्रश्न नागरिकांना पडला. एकमेकांच्या आरोपा वरून शहरात अवैध बांधकामाला सुगीचे दिवस आल्याचे उघड होते.
महापालिका अशा बांधकामावर पाडकाम कारवाई करीत नसल्याने, भूमाफिये, पालिका अधिकारी, स्थानिक नेते यांच्यात संगनमत तर नाही ना? असा संशय निर्माण झाला. शहरातील रस्त्याची दुरावस्था झाली असून दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. पाणी टंचाई, पालिकेतील विभागात सावळागोंधळ, साफसफाईचा बोजवारा, डम्पिंगचा प्रश्न ऐरणीवर. अवैध बांधकामे, आयुक्तांविरोधात उपोषण, अनधिकृत व धोकादायक इमारतीचा प्रश्न, उत्पन्नाचे स्रोतची मर्यादा आदी अनेक समस्याला शहर सामोरे जात आहे. असे असताना दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकाला आव्हान देण्याऐवजी शहरविकासात हातभार लावण्याचा सल्ला सर्वसामान्य नागरिक देत आहेत. उपमहापौर भगवान भालेराव यांच्या उपोषणामुळे पालिका आयुक्तांच्या मर्यादा उघड झाला असून शहर विकासासाठी आयुक्त बदलीची मागणी होत आहे.
आयुक्त बदलीचा सूर उमटत आहे
उपमहापौर भगवान भालेराव यांनी आयुक्त डॉ. राजा दयानिधी याना निष्क्रिय ठरवून आयुक्त दालना समोर गेल्या आठवड्यात उपोषण केले. याप्रकारने महापालिका कारभाराची लक्तरे लटकले असून आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या बदलीची मागणी नागरिकांकडून होत आहे.