लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : राज्यात शिवसेनेने भाजपला बाजूला सारून महाआघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र भिवंडी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी छुपी युती केल्याचे मंगळवारी समोर आले. पंचायत समितीत शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक असूनही सभापदीपदी भाजपच्या संध्या नाईक बिनविरोध निवडून आल्याने शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य कमालीचे नाराज झाले आहेत.
भिवंडी पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती विकास भोईर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापतीपदी मंगळवारी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अधिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपच्या नाईक यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी पाटील यांनी नाईक यांची बिनविरोध निवड जाहीर केली.भिवंडी पंचायत समितीत एकूण ४२ सदस्य असून शिवसेनेचे २०, भाजप १९, काँग्रेस २, मनसे १ असे पक्षीय बलाबल आहे. विशेष म्हणजे राज्यात महाआघाडी सत्ता स्थापन होण्याआधीच भिवंडी पंचायत समितीत भाजपविरोधात स्थानिक नेत्यांनी एकत्र येत महायुती स्थापन करून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे यांनी एकत्र येत पंचायत समितीवर एकहाती सत्ता आणण्याचा प्रयत्न केला आहे.
पंचायत समितीत महाआघाडीचे एकूण २३ सदस्य असतानाही अवघे १९ सदस्य असलेल्या भाजपच्या गळ्यात शिवसेनेने सभापतीपदाची बिनविरोध माळ का घातली, असा प्रश्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. तर बिनविरोध निवडून आलेल्या नाईक या अवघ्या तीन महिन्यांसाठी सभापती असल्याचे बोलले जात आहे.
वरिष्ठांच्या मनात नेमके काय सुरू आहे?याआधी शिवसेनेचे विकास भोईर हे अवघ्या पाच ते सहा महिन्यांसाठी सभापती होते. त्यामुळे सेना- भाजपचा हा सभापतीपदाचा सारीपाट आणखी किती दिवस चालेल? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमच्या पक्षश्रेष्ठींच्या मनात नक्की चाललंय काय हे आम्हाला माहीत नाही, मात्र सेनेच्या वरिष्ठांच्या या निर्णयामुळे आम्ही प्रचंड नाराज आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका पंचायत समितीच्या सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.