मीरा रोड/ भार्इंदर : मीरा-भार्इंदरच्या निवडणुकीत बंडखोरीच्या भीतीने एकाही पक्षाने उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली नाही. त्यामुळे अर्ज भरल्याची कुणकुण लागताच भाजपा, शिवसेनेत बंडखोरीला उधाण झाले. भाजपाच्या दोन इच्छुकांनी शिवसेनेतून तिकीट मिळवले, तर उरलेल्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरत आपला दावा कायम ठेवला. पण एबी फॉर्म वाटपातील गोंधळ, प्रतिस्पर्ध्याला तिकीट दिल्याने सुरू असलेली खडाजंगी आणि कार्यकर्त्यांतील रणकंदनामुळे दिवसभर पक्ष कार्यालयांना आखाड्याचे स्वरूप आले होते.उमेदवारीसह एबी फॉर्म मिळावे म्हणून भाजपा आमदार नरेंद्र मेहतांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेत राजकीय जत्राच भरली होती. मंगळवारची संपूर्ण रात्र आणि बुधवारी दुपारपर्यंत तिकीटावरून खडाजंगी चालली होती. तीन जागांवर भाजपाने दोघा-दोघा उमेदवारांना एबी फॉर्म वाटल्याने गोंधळ उडाला. भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी गजानन भोईर यांनी तर तिकीटावरुन जिल्हाध्यक्षांसह उपस्थितांची खरडपट्टी काढल्याने वातावरण तापले.भाजपा ज्येष्ठ नगरसेवक शरद पाटील यांचा त्यांच्या पारंपरिक पाच नंबरच्या प्रभागातून पत्ता कापण्यात आला. ते कळताच पाटील खवळले. त्यांनी शिवसेनेची वाट धरली. ते कळताच भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी त्यांना आपल्या गाडीतून नेत समजवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या क्षणी पाटील यांना प्रभाग १८ मधून उमेदवारी अर्ज भरावा लागला. या प्रभागात भाजपातून अनेक इच्छुक असताना विजय राय यांना एबी फॉर्म दिला होता. पाटील यांना तेथून उमेदवारी दिल्याने राय यांनी उमेदवारी मागे घेतली नाही, तर पाटील यांची कोंडी होणार आहे. त्यांच्या प्रभाग पाचमधून राकेश शहा यांना उमेदवारी देण्यात आली.नगरसेविका वर्षा भानुशाली यांनाही प्रभाग पाचमधून डावलून तेथे नगरसेविका मेघना रावल यांना उमेदवारी दिली. भानुशाली यांना प्रभाग २३ मधून संधी देण्यात आली.प्रभाग ४ मधून भाजपाचे नगरसेवक प्रेमनाथ पाटील यांची उमेदवारी निश्चीत मानली जात होती. परंतु ऐनवेळी प्रेमनाथ यांनी शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल करत आमदार नरेंद्र मेहतांना धक्का दिला. प्रेमनाथ यांच्या बंडखोरीनंतर भाजपाने नगरसेविका डिम्पल मेहता यांना तेथून हलवत थेट प्रभाग १२ या सुरक्षित मतदारसंघात नेले. डिम्पल या आमदार मेहतांच्या वहिनी असून महापौरपदाच्या दावेदार आहेत.भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना म्हात्रे यांचा पत्ता प्रभाग दोनमधून कापण्यात आला. तेथे यशवंत कांगणे यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. प्र्रभाग १४ मधून भाजपा नगरसेवक अनिल भोसले यांना घरचा रस्ता दाखवत मीरादेवी यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.प्रभाग २० मध्ये भाजपाने पुन्हा फेरबदल केला. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्यास गेलेल्या हेतल परमार यांना थांबवण्यात आले होते आणि मेहतांनी सुधीर कांबळी यांच्या पत्नीला अर्ज भरण्यास सांगितले होते. कांबळी यांनी अर्जही भरला. पण या प्रभागातील अन्य उमेदवारांनी कांबळीना जोरदार विरोध केल्याने सकाळी कांबळींचा पत्ता कापून पुन्हा परमार यांना उमेदवारी देण्यात आली.भाजपाने एकाच गटातील दोन-दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने खळबळ उडाली. प्रभाग २० मधून दिनेश जैन यांना बी फॉर्म दिला असतानाच भावेश गांधी यांनाही तो देण्यात आला. तर प्रभाग ७ मधून रोहिणी संजय कदम व रक्षा भूपतानी यांनाही एबी फॉर्म देण्यात आले. प्रभाग १३ मधून नवख्या अनिता मुखर्जी यांना उमेदवारी दिल्याने रजनी नागपाल यांनी बंडखोरी केली. प्रभाग १२ मध्येही गेली १० वर्ष भाजपाचे काम करणाºया अनुसूचित जाती-जमातीच्या जिल्हाध्यक्षा किरण गेडाम यांना डावलण्यात आले आहे. प्रभाग १७ मध्ये ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ता राजेंद्र मोरे यांना तर प्रभाग १९ मध्ये नांबियार यांना डालवलण्यात आले. ज्येष्ठांना डावलून नव्यांना उमेदवारी दिल्याने गेडाम, मोरे, नांबियार आदींनी बंडखोरी केलीआहे.
शिवसेना-भाजपात खडाजंगी, रणकंदन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:54 AM