ठाणे : स्व. आनंद दिघे यांच्या निधनानंतर मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत उद्धव ठाकरे यांनी आपल्याला ठाण्याचा जिल्हाप्रमुख होण्यासाठी ऑफर दिली होती, तसेच भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून आमदारकीचा प्रस्ताव आपल्यापुढे ठेवला होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटद्वारे केला. ऑफर नाकारली तरी त्यावेळी मुंडे यांनी आपल्यावर कधीच आकस ठेवला नाही, असा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मोठ्या रकमेच्या आमिषाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जात असल्याच्या चर्चेला उधाण आले असताना आव्हाड यांनी आपल्या पक्षनिष्ठेचा भावनिक मुद्दा केला आहे. आपल्या राजकीय कारकीर्दीचा प्रवास मांडताना आव्हाड म्हणाले की, मी साधारण १९८७ मध्ये शरद पवार यांच्या संपर्कात आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. त्यानंतरच्या दोन घटनांत आपल्यालाही पदाचे आमिष दाखवले गेले. एके दिवशी सकाळी ७ वाजता मुंडे यांनी प्रमोद महाजन यांच्याशी चर्चेनंतर आमदारकीचा प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला होता. त्यावेळी पवार यांना सोडणार नाही, असे आपण त्यांच्या पत्नीमार्फत स्पष्ट कळवले होते. मात्र, माझ्या नकाराचा मुंडे यांनी कधीच आपल्यावर राग ठेवला नाही. त्यानंतरही ते मला माेकळेपणाने सतत भेटत राहिले, अशी आठवणही आव्हाड यांनी सांगितली. दुसरी घटना, आनंद दिघे यांच्या निधनानंतरची आहे. रघुनाथ मोरे हे जिल्हाप्रमुख झाले. त्यांचाही अपघात झाला. त्याच काळात संघर्ष संस्थेच्या कार्यालयात देवीदास चाळके बसले होते. त्यावेळी मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होण्याची ऑफर दिली होती. मातोश्रीशी निष्ठावान राहील असा कोणीतरी आम्हाला जिल्हाप्रमुख करायचा आहे, तू विचार करून सांग, असे नार्वेकर म्हणाले. त्यावेळीही आपण पवार यांची साथ सोडणार नाही, तुम्ही माझा एवढा विचार केलात, त्याबद्दल मी आभारी असल्याचे नार्वेकर यांना म्हटले होते, असे आव्हाड यांनी सांगितले.
हिशेबावर निष्ठा ठरत नसतात -- २०१४ आणि २०१९ मध्ये पवार यांनी आपल्याला मंत्री केले. - सर्वच राजकीय संकटांमध्ये ते कायम पाठीशी उभे राहिले. - त्यामुळे काही मिळो किंवा न मिळाे आपण त्यांची साथ सोडणार नाही. - हिशेबावर निष्ठा ठरत नसतात, असा टोला आव्हाड यांनी स्वपक्षाच्या माजी नगरसेवकांना लगावला. - तुम्हाला ज्यांनी घडविले, त्यांच्यासोबत तुम्ही घडल्यावर कसे वागता, याचा विचार प्रत्येक माणसाने स्वत:हून करायला हवा. - स्वत:ला भाव लावून विकणाऱ्यांची किळस येते, अशा शब्दांत त्यांनी माजी नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या.