ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि बीजेपीमध्ये जशी जुगलबंदी रंगली होती, तशी जुगलबंदी ठाण्यात पाहण्यास मिळत आहे. कल्याणात त्यांनी एकमेकांचे कपडे काढले आणि मग एकत्र आले. सत्तेसाठी असाच एक कलमी कार्यक्रम दोन्ही पक्षांत सुरू असल्याची टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी बुधवारी ठाण्यात केली. डम्पिंग, रस्ते, परिवहन यासारख्या समस्या सोडाच, २५ वर्षांत शुद्ध पाणी देण्याची धमकही सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. यांनी कोणती सेवा दर्जेदार दिली, ते तरी सांगा, असा सवाल करून प्रत्येक निवडणुकीत चौपाटी बनवणारे निवडणूक आली की, माती टाकणे चालू करतात. मुंबई असो वा ठाण्यात, किती भ्रष्टाचार आहे. ठाण्यात कोणाचा हस्तक्षेप आहे. पैसे कोणाकडे जातात, असे प्रश्न त्यांनी या वेळी केले.ठाण्यातील क्लस्टरच्या प्रस्तावाला आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली. पण, अंमलबजावणी करण्याचे यांना जमत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सचिव बाळकृष्ण पूर्णेकर, शहराध्यक्ष मनोज शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, शहराध्यक्ष आनंद परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘शिवसेना-भाजपाची जुगलबंदी ठाण्यातही’
By admin | Published: February 17, 2017 1:54 AM