उल्हासनगर : मातृ-पितृचे छत्र हरपलेल्या निराधार तीन भावंडाना शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे व जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी मदतीचा हात दिलेल्या तिन्ही भावंडांना पारस आश्रम शाळेने छत्रछाया दिली. तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च उकलण्याचा निर्धार बोडारे बंधूनी केला आहे.
उल्हासनगर काम नं-५, एसटी कॉलोनी, न्यूनगर मध्ये राहणारे सुरेश कांबळे व त्यांच्या पत्नीचा लागोपाठ मृत्यू झाल्याने, नम्रता, संभव व पवनकुमार हे तिन्ही भावंड अनाथ झाले. मुलांचं पुढे कसं होणार? असा प्रश्न नातेवाईक व शेजारील नागरिकांना पडला. यावेळी मुलांची आत्या अनिता कांबळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उपशाखाप्रमुख अंबाजी चव्हाण व संतोष सानप यांच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख माननीय चंद्रकांत बोडारे व जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांची भेट घेतली. बोडारे बंधूनी तिन्ही मुलांच्या शिक्षणाची व संगोपनाची जबाबदारी घेऊ असे आश्वासन देऊन मदत केली.
मुलांचे पुढील भविष्य चांगले जाण्यासाठी टिटवाळा येथील संजय गुंजाळ व माई गुंजाळ यांच्या पारस आश्रमशाळेला याबाबत माहिती दिली. तिन्ही मुले पारस आश्रमात पुढील शिक्षण पूर्ण करणार असून आश्रमात जाण्यापूर्वी मुलांनी संतोषनगर शिवसेना शाखेत येऊन चंद्रकांत बोडारे व धनंजय बोडारे यांची भेट घेतली. यावेळी बोडारे बंधुसह माजी नगरसेवक विजय सावंत, कणसे काका, प्रा.प्रकाश माळी व संभाजी चोरघडे व शिवसैनिकांनी मदत केली. तसेच मुलांना निरोप देतांना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते.