डोंबिवली : ‘कल्याण लोकसभा निवडणुकीत गुलाल आम्हीच उधळणार’, असे सूतोवाच शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी केले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर विजयोत्सव साजरा करण्यासाठी गुरुवारी २०० किलो गुलाल, फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी हजारोंच्या माळा, हार, फुले यासह मावळ येथून प्रसिद्ध असलेल्या ढोल पथकास पाचारण केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे श्री गणेश मंदिर संस्थानात जाऊन गणेशाचे दर्शन घेऊन मतमोजणी केंद्राकडे जाणार असल्याचे सांगण्यात आले.
वातावरणनिर्मितीसाठी मध्यवर्ती कार्यालयाची गेला आठवडाभर रंगरंगोटी करण्यात आली. तर, बुधवारी रात्री येथील शाखेच्या तीनही इमारतींना रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि सभोवतालीही हिरव्या रंगाची लायटिंग करण्यात आली आहे. ‘गुलाल हा आम्हीच उधळणार’ या टॅगलाइनवर शिवसैनिक गुरुवारी सकाळपासूनच मतदान केंद्राजवळ घोषणा देऊन वातावरणनिर्मिती करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच सोशल मीडियावरही विविध प्रकारे विजयी लल्लाट निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले....बाकी साईबाबांची इच्छाराष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी आपली मदार आगरी समाजावरच असल्याचे पुन्हा बुधवारी स्पष्ट केले आणि माझाच विजय होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाकी साईबाबांची इच्छा, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.