ठाणे : शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांना खोकला आल्यावर तत्परतेने पाणी देणारे, त्यांना रुमाल देणारे व त्यांच्या पाठीमागे ‘सावली’प्रमाणे उभे असलेले त्यांचे सहायक चम्पासिंग थापा यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. तसेच बाळासाहेब यांचे पूर्वाश्रमीचे खासगी सचिव मोरेश्वर राजे यांनीदेखील शिंदे यांची कास धरली.
बाळासाहेब यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून थापा ओळखले जातात. बाळासाहेब राज्यात दौरे करायला किंवा सभेकरिता जात, त्यावेळेस त्यांच्यासोबत थापा हे सावलीसारखे असायचे. बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांना औषधे आणि जेवण देणे अशी कामे ते करीत होते. ‘मातोश्री’मधील एक सदस्य ही त्यांची ओळख होती.
बाळासाहेब यांच्या निधनानंतर थापा यांनी ‘मातोश्री’सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीच्या मिरवणुकीदरम्यान भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. ठाकरे यांची विचारधारा पटत नाही का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, थापा म्हणाले की, प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते. माझ्या मनाला वाटले म्हणून मी शिंदे यांच्याकडे आलो. त्याव्यतिरिक्त माझ्या मनात काहीच नाही. उद्धव यांच्या भेटीगाठी व्हायच्या आणि मातोश्रीवरही जात होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार मुख्यमंत्री शिंदे हे पुढे नेत असल्याचे थापा यांनी सांगितले.
दहीहंडी, गणेशोत्सवात ९ हजार कोटी उलाढाल
- शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर अडीच वर्षांनंतर सण-उत्सव निर्बंधमुक्त झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून, व्यापारी वर्गाचा उत्साह वाढला आहे.
- परिणामी दहीहंडी आणि गणेशोत्सवादरम्यान सुमारे नऊ हजार कोटींची उलाढाल झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
- नवरात्रोत्सवातही अशीच मोठी उलाढाल होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.