अंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापुरात नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली असली, तरी उपनगराध्यक्षपदावरून संभ्रम आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षांना पाठिंबा देत काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावल्याने हे पद काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तर, बदलापुरात उपनगराध्यक्षपद हे भाजपाच्या वाट्याला असले, तरी भाजपात संंजय भोईर आणि राजश्री घोरपडे यांच्यात चुरस आहे.अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्षाचा घोळ कायम आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने उमेदवार देण्याचा आणि इतर नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेच्या एका गटाला सोबत घेऊन भाजपा नगराध्यक्षपदाचे स्वप्न रंगवत होता. भाजपाच्या या रणनीतीचा अंदाज शिवसेना नेत्यांना आल्याने त्यांनी आपल्या परीने प्रयत्न केले. तसेच कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी काँग्रेसला सोबत घेतले. मात्र, नगराध्यक्षपदासाठी आवश्यक नगरसेवकांचे संख्याबळ गाठणे भाजपाला अशक्य झाल्यावर त्यांनी अर्ज भरण्याच्या दिवशी माघार घेत शिवसेना उमेदवाराला समर्थन दिले. सेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाल्याने शिवसेनेचे काही नेते आणि नगरसेवक भाजपाच्या भूमिकेवर नाराज आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसला पहिली पसंती आहे. बदलापुरात भाजपातर्फे संजय भोईर आणि राजश्री घोरपडे यांची नावे पुढे करण्यात येत आहेत.मालेगाव, भिवंडीप्रमाणे शिवसेना काँग्रेस एकत्र येत भाजपाला चपराक लगावण्याची चिन्हे आहेत.बदलापुरात भाजपाच्या वाट्याला उपनगराध्यक्षपद आल्याने भाजपातील दोन प्रमुख इच्छुकांपैकी कोणाला हे पद मिळणार, याची उत्सुकता आहे.
अंबरनाथमध्ये शिवसेना-काँग्रेस युती?, बदलापूरला भोईर, घोरपडे चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 2:58 AM