कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना नगरसेविका वैजयंती घोलप यांनी त्यांच्याच पक्षाच्या नगरसेविका मनीषा तारे यांचा अवमान केला होता. अशा प्रकारे अन्य कोणत्याही नगरसेविकेचा अवमान होऊ नये, असे कारण सांगत तारे यांनी त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा गुरुवारी महापौर कार्यालयातील सचिव संजय डवले आणि सभागृह नेते राजेश मोरे यांच्याकडे दिला. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, तारे यांनी राजीनाम्याचा इन्कार केला आहे.महापौरपदासाठी शिवसेनेने त्यांच्या नगरसेविका विनीता राणे यांना संधी दिली. राणे यांचे पती विश्वनाथ राणे हे अगोदर शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले होते. तेथून पुन्हा ते शिवसेनेत आले. असे असताना महापौरपदासाठी त्यांच्या पत्नीला संधी दिल्याने शिवसेनेत नाराजी सूर उमटला. आगरी समाजाच्या नगरसेविकांची संख्या जास्त असताना पक्षाने त्यांना संधी दिली नाही, असा मुद्दा महापौरपदाची घोषणा होताच सभागृहात उपस्थित झाला होता. त्यावरून घोलप यांचा सभागृहातच आगरी नगरसेविकांशी वाद झाला. त्यावर, पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांनी सारवासारव केली होती. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना जातपात मानत नाही. त्यामुळे हा विषय महत्त्वाचा नाही, असे स्पष्ट केले होते.>ठाकरेंच्या दौऱ्याचे निमित्तशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी उल्हासनगरात जाहीर सभा होती. त्या पार्श्वभूमीवर तारे यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरले. तारे यांनी त्यांचा राजीनामा डवले आणि मोरे यांच्याकडे दिला होता. त्यात त्यांनी अवमान झाल्याने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. परंतु, शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी तारे यांना तातडीने बोलावून त्यांची समजूत काढली.याबाबत, तारे यांना विचारले असता त्यांनी राजीनामा दिलाच नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, राजीनाम्याचे पत्र व त्यावरील स्वाक्षरीविषयी विचारताच त्यांनी अधिक भाष्य केले नाही.
शिवसेना नगरसेविकेने दिला राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 2:58 AM