भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित इतरत्र बदली करण्याच्या मागणीसाठी ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी शुक्रवारपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनात सेनेचे नगरसेवक, नगरसेविकांसह पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.आंदोलनाची सुरुवात पालिका मुख्यालयातील शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. काही मल्लांनी मारुतीच्या मुखवट्यात आंदोलनाला सबळ आशीर्वाद दिल्यानंतर मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी विरकर यांनी आंदोलनाच्या आदल्या दिवशी उपायुक्त (मुख्यालय) विजयकुमार म्हसाळ यांनी आपल्याला चर्चेला आमंत्रित केल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी आपल्या मागणीवर कार्यवाही करून प्राप्त अहवालानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले. परंतु जोपर्यंत ठोस कार्यवाही केली जाणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे विरकर यांनी सांगितले.तत्पूर्वी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी देखील विरकर यांच्या पत्राची दखल घेत त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश आस्थापना विभागाला दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या या कागदी घोडे नाचविण्याच्या आश्वासनावर आपला विश्वास नसून त्याची कल्पना पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे व आ. प्रताप सरनाईक यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला पालकमंत्र्यांसह आमदारांनी जाहीर पाठिंबा दर्शविल्याने आंदोलनाला धार आल्याची प्रतिक्रिया शिवसेनेत उमटू लागली आहे.पालिकेतील टक्केवारी वाढू लागली असून त्यात शहराचा विकास भकास होऊ लागला आहे. यापूर्वी याकडे आपण दुर्लक्ष केले होते. परंतु विकासाचे नियम धाब्यावर बसवून शहराचा विकास निकृष्ट दर्जाचा होऊ लागल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. याला एकाच पदावर गेली १५ ते २० वर्षांपासून ठाण मांडणारे अधिकारीच जबाबदार असल्याचे समोर आल्याने त्यांची बदली इतर विभागात होणे आवश्यक बनले आहे. सरकारी सेवा अटी व शर्ती नियमानुसार एका पदावर ३ वर्षे सेवा देणे अनिवार्य असतानाही त्याला प्रशासनाकडून बगल देण्यात येत असल्याचा आरोप विरकर यांनी केला. त्या अधिका-यांमुळे सक्षम अधिका-यांवर अन्याय होत असून प्रशासनाकडून मात्र त्यांची वाटेल तशी बदली केली जात आहे. त्यासाठी सेवाकाल विचारात घेतला जात नाही. असे अधिकारी निमुटपणे बदली झालेल्या ठिकाणी काम करून सेवा बजावतात.परंतु टक्केवारीत गुंतलेले व सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेले अधिकारी झालेली बदली रद्द करण्यासाठी राजकीय वजनाचा वापर करत असल्याचा दावा त्यांनी केला. अशा प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासुन एकाच पदावर मलाईदार कारभार करणाऱ्यांची त्वरित इतरत्र बदली करून आयुक्तांनी त्यांना धडा शिकवावा, या मागणीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसल्याचे विरकर यांनी सांगितले. आंदोलनात शहरप्रमुख धनेश पाटील, प्रशांत पालंडे, नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर, जयंतीलाल पाटील, अनंत शिर्के, नगरसेविका अनिता पाटील, तारा घरत, पदाधिकारी तनुजा विरकर, पप्पू भिसे, प्रवीण उतेकर आदी सहभागी झाले होते.
शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचे बेमुदत धरणे आंदोलन, नगरसेवक, नगरसेविकांसह पदाधिकाऱ्यांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 4:26 PM