अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा अजून उमेदवार निश्चित झालेला नाही, तर ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे यांच्या विरोधात महायुतीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. शिवसेना (शिंदे गट) हा मतदारसंघ सोडायला बिलकूल तयार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरात त्यांचाच खासदार नसेल हे शिवसेनेला रुचणार नाही. मात्र, शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांची भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्म्यावर आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघात २०१९ मध्ये राजन विचारे यांना ७ लाख ४० हजार ९६९ मते मिळाली होती. त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांना ३ लाख २८ हजार ८२४ मते मिळाली होती. परंतु आता राजकीय चित्र बदलले असून शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे ठाण्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत विचारे यांना मोदी लाटेमुळे सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. यावेळी मोदींचा करिश्मा शिंदे गटासाठी फायदेशीर ठरणार किंवा कसे, याबाबत तर्क-वितर्क केले जातात. ठाण्याच्या जागेवरून शिवसेना व भाजपमधील संबंध ताणले गेले तर त्याचा परिणाम निकालावर होऊ शकतो.