कल्याण : केडीएमसीच्या परिवहन, शिक्षण आणि दहा प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक १२ जूनला होत असलीतरी नव्याने निवडून येणाऱ्या सभापतींना कमी कालावधी मिळणार आहे. लोकसभेपाठोपाठ आता लवकरच लागू होणाºया विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांना कामकाज करण्यासाठी कमी अवधी मिळणार आहे.
परिवहन समितीमधील सहा सदस्य २८ फेब्रुवारीला निवृत्त झाले. रिक्त जागांसाठी तत्पूर्वी १५ फेब्रुवारीला निवडणूक घेण्यात आली. यात शिवसेनेचे सुनील खारूक, अनिल पिंगळे, बंडू पाटील तर भाजपचे संजय मोरे, स्वप्नील काठे, दिनेश गोर निवडून आले. निवडणुकीनंतरचे समितीमधील पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेचे आणि भाजपचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. स्थायी समिती सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो आणि हे पद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे सेनेचे सध्या सात सदस्य समितीमध्ये आहेत. सभापतीपदाची टर्म आता शिवसेनेची आहे. शिवसेनच्या मनोज चौधरी, मधुकर यशवंतराव, सुनील खारूक, अनिल पिंगळे, बंडू पाटील यांच्यापैकी कोणाला सभापतीपदाची संधी मिळते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. परिवहन सभापतीपदाचा कालावधी एक वर्षाचा असतो. त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित होते. लोकसभा आचारसंहितेमुळे होऊ शकली नाही.
जूनमध्ये निवडणूक होत असल्याने निवडून येणाºया नव्या सभापतींना नऊ महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. तर मार्चमध्ये मुदत संपुष्टात येऊनही आचारसंहितेमुळे शिक्षण समिती सदस्यांची नियुक्तीही वेळेवर होऊ शकली नाही. ही प्रक्रिया ९ मे रोजी पार पडली. पक्षीय बलाबलानुसार शिवसेना ५, भाजप ४, मनसे आणि काँग्रेस प्रत्येकी १ अशी स्थिती असलेल्या समितीत शिवसेनतर्फे नमिता पाटील, छाया वाघमारे, माधुरी काळे, ऊर्मिला गोसावी, भारती मोरे, भाजपकडून मोनाली तरे, शीतल गायकवाड, जालिंदर पाटील तर विद्या म्हात्रे यांची नियुक्ती केली आहे. मनसेचे प्रभाकर जाधव आणि काँगे्रसचे नंदू म्हात्रे यांचीही समितीवर वर्णी लागली आहे. दरम्यान, गतवर्षी शिक्षण समितीचे सभापतीपद भाजपच्या वाट्याला गेले होते. यंदा शिवसेनेची टर्म असल्याने कोणाची सभापतीपदी वर्णी लागते, याकडे लक्ष लागले आहे. नमिता पाटील, माधुरी काळे, छाया वाघमारे, भारती मोरे यांची नावे सभापतीपदासाठी चर्चेत आहेत. दरम्यान, निवडून येणाºया नव्या सभापतींना दहा महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. तर प्रभाग समिती सभापतींची निवडणूकही एप्रिलमध्ये व्हायला हवी होती.
सोमवारी दाखल होणार अर्जपरिवहन, शिक्षण आणि प्रभाग समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केले जाणार आहेत. महापालिका सचिव संजय जाधव यांच्याकडे सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ५.३० या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत. १२ जूनला निवडणूक होणार असून या प्रक्रियेच्या आधी उमेदवारी अर्जांची छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.
आचारसंहितेमुळे कामकाजाला ‘खो’लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सभापतीपदाच्या निवडणुकांना विलंब लागला असताना सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल, त्यामुळे तेव्हा समितीचे कामकाज चालणार नाही. त्यामुळे आधीच कमी कालावधी मिळणाºया नव्या सभापतींना लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचाही फटका बसणार आहे.