भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील विरोधी पक्ष नेते पदावरील नियुक्ती महापौर डिंपल मेहता यांनी अद्याप प्रलंबित ठेवल्याने संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी थेट महापौर दालनाचा ताबा घेतला. मात्र शिवसेनेच्या या अनपेक्षित आंदोलनाची कुणकूण महापौरांना लागल्याने त्यांनी आपल्या दालनात येणेच टाळले.
पालिकेतील विरोधी पक्षातील शिवसेना हा पहिला तर सत्ताधाऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याने नियमानुसार या पक्षाच्या वाट्याला विरोधी पक्ष नेते पद आले आहे. त्यानुसार शिवसेनेने १६ ऑक्टोबरला पार पडलेल्या विशेष महासभेपूर्वीच महापौरांना त्या पदावर राजू भोईर यांची नियुक्ती करण्याचे शिफरस पत्र गटनेता हरिश्चंद्र आमगावकर यांनी दिले. परंतू, महापौरांनी भोईर यांच्या नावाची घोषणा न करता ती पुढील महासभेत करण्याचे आश्वासन सेनेला दिल्याने सेनेने प्रतिक्षा करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ८ नोव्हेंबरच्या दुसऱ्या महासभेत सेनेला भोईर यांच्या नावाची घोषणा होण्याची आस लागली असतानाच महापौरांनी त्याला बगल दिली. त्यावेळी त्यांनी पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार हे पद तांत्रिक अडचणीची असून महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार विरोधी पक्षातील मोठ्या पक्षाचा नेता महापौरांकडुन घोषित झाल्यास त्या पदावर त्याच नेत्याची (गटनेता) नियुक्ती करण्याच्या मुद्यावर राज्य सरकारचा अभिप्राय मागविल्याचे स्पष्ट केले. हा अभिप्राय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या पदावर नियुक्तीच करणार नसल्याचे स्पष्ट केले.
महापौरांच्या या राजकीय शाब्दिक खेळीमुळे सेना सदस्यांचा पारा वर चढला. त्यांनी त्या महासभेत गोंधळ घातल्याने महापौरांनी सेनेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक प्रवीण पाटील यांना समजपत्र पाठवून यापुढे असा गोंधळ खपवून घेणार नसल्याची तंबी दिली. पाटील यांनी देखील सेनेच्या थाटणीत महापौरांना उत्तर देत २० नोव्हेंबरपर्यंत विरोधी पक्ष नेता पदावर भोईर यांची नियुक्ती करण्याचे अल्टिमेटम महापौरांना दिले. तसे न केल्यास विरोधी पक्ष नेत्याच्या दालनाचा परस्पर ताबा घेऊन कारभार सुरु करण्याचा इशारा दिला. शिवसेनेचा हा इशारा हवेत विरळ झाल्याचे वृत्त लोकमतने मंगळवारी प्रसिद्ध करताच सेनेने विरोधी पक्ष नेता दालनाऐवजी थेट महापौर दालनाचा मंगळवारी ताबा घेण्याचा निर्णय घेतला. सेनेच्या या आंदोलनाची कुणकूण महापौरांना अगोदरच लागल्याने त्या दालनात उपस्थितच राहिल्या नाहीत. तरी देखील महापौरांच्या आसनाजवळील खुर्चीत विरोधी पक्ष नेता पदाचे दावेदार भोईर यांनी ठाण मांडले.
यानंतर त्यांच्या नावाची पाटील महापौरांच्याच टेबलावर ठेवण्यात येऊन सेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी भोईर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी शहरप्रमुख धनेश धर्माजी पाटील, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेवक प्रवीण पाटील, धनेश परशुराम पाटील, कमलेश भोईर, नगरसेविका तारा घरत, अनिता पाटील, स्रेहा पांडे, शर्मिला बगाजी, भावना भोईर, कुसुम गुप्ता, उपशहर प्रमुख लक्ष्मण जंगम, पदाधिकारी पप्पू भिसे आदी उपस्थित होते. याबाबत आ. प्रताप सरनाईक म्हणाले कि, सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार सेनेने मोडुन काढीत थेट महापौरांच्या दालनाचा ताबा घेतल्याने त्यांचे अभिनंदन. जोपर्यंत महापौर भोईर यांच्या नावाची घोषणा करीत नाही, तोपर्यंत त्यांच्याच दालनात विरोधी पक्ष नेत्याचा कारभार सुरु राहील. तशी सुचना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महापौरांच्या दालनात भोईर यांचा कारभार सुरु झाल्याने महापौरांचेच दालन तळमजल्यावर स्थलांतरीत होत असल्याची माहिती मिळाली आहे.