कल्याण : केडीएमसीतील शिवसेना नगरसेविका आशालता बाबर आणि प्रेमा म्हात्रे यांच्यात हाणामारीचा प्रकार सोमवारी रात्री शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घडला. एका सोसायटीला पाणीजोडणी देण्यावरून झालेल्या बाचाबाचीनंतर म्हात्रे यांनी बाबर यांच्या कानशिलात भडकावल्याचा प्रकार झाला. दरम्यान, म्हात्रे यांनी बाबर यांना मारहाण केली नसल्याचे म्हटले आहे.
नांदिवली मिनल पार्क या प्रभागाच्या नगरसेविका असलेल्या बाबर या पाणीसमस्या असलेल्या रविकिरण सोसायटीत जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. त्याला यश न आल्याने लोकवर्गणीतून सोसायटीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. अखेर या सोसायटीला पाण्याचे एक कनेक्शन देण्याचे ठरले; मात्र त्याला म्हात्रे यांनी हरकत घेतली. रविकिरण सोसायटीला पाणीकनेक्शन दिल्यास म्हात्रे यांच्या प्रभागातील पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होईल, असा म्हात्रे यांचा आक्षेप होता. म्हात्रे यांनी घेतलेल्या हरकतीचा विषय बाबर यांनी पक्षनेत्यांकडे मांडला होता. मात्र, त्यावर तोडगा न निघाल्याने त्यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे धाव घेतली. बाबर यांचे म्हणणे ऐकल्यानंतर याबाबत शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयात बैठक ठेवली होती.सोमवारी सायंकाळी ठेवलेल्या या बैठकीला म्हात्रे आल्या नव्हत्या. त्यांचे पती प्रकाश म्हात्रे आले होते. यावेळी चर्चाही चांगली झाली. मात्र, त्याचवेळी बाबर यांचा समर्थक सचिन म्हात्रे याला गेटवर मारहाण होत असल्याचे काही महिलांनी येऊन बाबर यांना सांगितले. त्याला सोडवण्यासाठी बाबर यांनी गेटवर धाव घेतली. त्याचवेळी प्रेमा म्हात्रे यांनी पाठीमागून येऊ न बाबर यांच्या पाठीत गुद्दा मारला. त्यानंतर त्या मागे वळल्या असता म्हात्रे यांनी त्यांच्या कानशिलात लगावली. तेथे असलेल्या महिलांनी बाबर यांची सुटका केली. त्यानंतर बाबर यांनी तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेव्हा पावसामुळे वीज गुल झाली होती. त्यामुळे त्यांची तक्रार लिहून न घेता पोलिसांनी त्यांना मंगळवारी बोलावले आहे. याप्रकरणी तक्रार देणार असल्याचे बाबर यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले की, म्हात्रे यांनी बाबर यांना मारहाण केल्याचे वृत्त चुकीचे आहे. तसा काही प्रकार घडलेला नाही. वाद असेल तर दोन्ही नगरसेविकांना समज दिली जाईल.मारहाण केली नाही : प्रेमा म्हात्रेनगरसेविका म्हात्रे यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की, बाबर यांनी पाणीजोडणी संबंधित सोसायटीला दिली, तर त्याचा विपरीत परिणाम आमच्या प्रभागात होणार आहे. त्याला आम्ही हरकत घेतल्याने बाबर यांच्याशी वाद झाला. मात्र, बाबर यांच्या पाठीत गुद्दा मारला, कानशिलात लगावली हे खोटे आहे. तेथे महिला आघाडीच्या अन्य कार्यकर्त्याही होत्या. त्यांच्यासमोरच हा प्रकार झाला.