ठाणे : भाजपचे स्थानिक आमदार व नेते ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावे करीत असल्याने भाजपकडील भिवंडी लोकसभा मतदारसंघावर दावा करण्याचा निर्णय शिवसेनेच्या ठाण्यातील आनंद आश्रम येथे बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी लोकसभेतील आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि महिला जिल्हाप्रमुख आदींसह इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेच्या मतदारसंघांवर दावे करून भाजपकडून वारंवार डिवचले जात असल्याने आता शिवसेनेने आपली रणनीती आखण्याचे ठरवले आहे. या बैठकीला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील हजर होते. राज्यात शिवसेना आणि भाजप हातात हात घालून काम करीत असताना ठाण्यात भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांवर चिखलफेक तसेच दावे-प्रतिदावे केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी हे वादळ काहीसे शांत झाल्याचे दिसत होते. मात्र, कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण लोकसभेवरून शिवसेनेला डिवचले. यापूर्वीदेखील भाजपच्या काही नेत्यांनी ठाणे आणि कल्याण लोकसभेवर दावा केला होता.
बिब्बा घालणाऱ्यांची तक्रार करणारशिवसेना युतीचा धर्म पाळत आहे. त्यांच्याकडून कुठेही अशा प्रकारची वक्तव्ये केली जात नसल्याचे मत बैठकीत अनेकांनी व्यक्त केले. मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून युतीत बिब्बा घालण्याचे काम का केले जात आहे, असा सवाल काहींनी या बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपच्या वाद निर्माण करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी भाजप नेत्यांकडे केल्या जातील, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली. - नरेश म्हस्के, प्रवक्ता, शिवसेना