शिवसेना- राष्ट्रवादीत श्रेयवादावरुन लढाई; प्रत्येकाचा अजेंडा वेगळा, काँग्रेसचा स्वबळाचा नारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 01:08 PM2022-04-05T13:08:14+5:302022-04-05T13:08:26+5:30
ठाणे : राज्यात महाआघाडीचेच सरकार असले, तरी कामे होत नसल्याची तक्रार काँग्रेसच्या २७ आमदारांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली असली, ...
ठाणे : राज्यात महाआघाडीचेच सरकार असले, तरी कामे होत नसल्याची तक्रार काँग्रेसच्या २७ आमदारांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली असली, तरी राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार पाच वर्षे सत्तेत राहील, असा दावा ठाणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. स्थानिक पातळीवर ठाण्यातदेखील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात श्रेयवादाची लढाई आजही सुरू असून, काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरदेखील महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे चित्र आहे.
राज्यात महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून तू तू मै मै सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे तक्रार केल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसनेदेखील २७ आमदारांसह सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र, महाविकास आघाडीत काही कुरबुरी असल्या, तरी हे सरकार एकदिलाने काम करीत असल्याचे मत जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. एकाही नेत्याने याबाबत कोणत्याहीप्रकारच्या तक्रारी नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आघाडीत एकी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवरदेखील आघाडी व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.
सत्ताधाऱ्यांचे जिल्ह्यात जुळते का?
ठाण्यात सध्या शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू आहे, खारेगाव येथील उड्डाणपूल असो किंवा म्हाडाच्या रहिवाशांना व्याज, दंड माफीचा विषय असेल, यावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आजही रंगला आहे; तर दुसरीकडे काँग्रेसनेदेखील स्वबळाचा नारा दिलेला आहे. तेही शिवसेनेवर टीका करीत आहेत. शिवसेनेने ‘मिशन महापालिका निवडणूक’ सुरू केले असून, त्यातूनच काही दिवसांपूर्वी प्रभाग रचनेवरून या दोन्ही पक्षांत शहरात वाद रंगला होता. स्थानिक पातळीवरील नेते हे आपसात भांडत असले, तरीदेखील वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत असल्याचेच दिसत आहे.
प्रत्येकाचा अजेंडा वेगळा
शिवसेना - ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने पुन्हा एकदा १०० जागा निवडून येण्याचा दावा केला आहे. त्यानुसार त्यांनी यापूर्वीच मिशन कळवा, मुंब्रा सुरू करून राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय केलेल्या प्रत्येक कामाचे श्रेय शिवसेना घेत आहे. येत्या काळात इतर पक्षांतील नगरसेवकांना फोडण्याचा अजेंडादेखील त्यांनी आखला आहे.
राष्ट्रवादी - राष्ट्रवादीने मागील निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही कळवा, मुंब्य्रावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. तसेच शिवसेना एकीकडे कामांचे श्रेय घेत असताना त्या कामांचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे मिशन ४५ ते ५० नगरसेवकांचे आहे. त्यात कळवा, मुंब्य्राला अधिक महत्त्व दिले आहे. याशिवाय राष्ट्रवादी ठाण्यात विरोधी पक्षात असल्याने सत्ताधाऱ्यांना विरोध करण्याचा एकही डाव राष्ट्रवादी सोडत नाही.
काँग्रेस - ठाण्यात काँग्रेसचे केवळ तीनच नगरसेवक आहेत. त्यांच्यात त्यांचे जमेनासे चित्र आहे. त्यात काँग्रेसने महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. परंतु, तीन नगरसेवकांवर स्वबळाचा नारा कितपत टिकणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. सत्ताधाऱ्यांना विरोध करायचा असा काहीसा अजेंडा काँग्रेसचा दिसून आला आहे.
काय म्हणतात जिल्हाध्यक्ष?
राज्यात योग्यप्रकारे सरकारचे कामकाज सुरू आहे. स्थानिक पातळीवरदेखील आम्ही महाविकास आघाडी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, आरोप-प्रत्यारोप होत असतील, तर मात्र शिवसेनादेखील स्वबळावर लढेल.
(नरेश म्हस्के - जिल्हाध्यक्ष - शिवसेना)
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. ते टिकणारही आहे. त्यानुसार ठाण्यातही आगामी निवडणुकीत आघाडी व्हावी, ही आमची आधीपासूनची इच्छा आहे. त्यानुसार आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. परंतु, आघाडी झाली नाही, तर आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास तयार आहोत.
(आनंद परांजपे - शहर अध्यक्ष - राष्ट्रवादी)
स्थानिक पातळीवर शिवसेनेबरोबर महाविकास आघाडी शक्य नाही. राज्यातही काँग्रेसच्या आमदारांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पदाधिकाऱ्यांना मान-सन्मान दिला जात नाही. शिवसेनेकडून अन्याय सुरू आहे. महामंडळे घोषित केली जात नाहीत. चुकीचे काम सुरू असून, भाजपला रोखण्याचे काम सुरू आहे की? काँग्रेसला, हेच समजत नाही.
(विक्रांत चव्हाण - शहराध्यक्ष - काँग्रेस)