टिटवाळा-: परतीच्या अवकाळी पावसाने राज्यासह ठाणे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. याच शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांना शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी आवाहन केले आहे. या धर्तीवर कल्याण तालुक्यातील फळेगांव येथे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या सुचनेनुसार शिवसैनिकांची बैठक झाली. या बैठकीत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मदत हात देण्यासाठी मदत केंद्रे उभारण्यासाठी चर्चा झाली.
कुणी मदत केली नाही तरी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सदैव तयार आहे. प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी रडत न बसता एकत्र यावे. कर्जमाफी, पीकविमा आदींसह शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शिवसेना जिल्हा तसेच तालुका स्तरावर मदत केंद्र सुरू करणार आहे. अशी ग्वाही देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रमुखांची मिटिंग घेत सर्वांना अवकाळी पावसामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत.
याच धर्तीवर कल्याण तालुक्यातील फळेगांव येथे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटिल यांच्या सुचनेनुसार रवीवारी सकाळी शिवसेनेचा पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले की, अवकाळी पावसामुळे शेतीचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांकरीता कल्याण तालुक्यातील प्रत्येक गावाच्या शिवसेना शाखेत मदत केंद्र निर्माण करून अर्ज वाटप करण्यात यावेत. ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा.
हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातातून अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतातुर झाला असून, त्यांना नुसकान भरपाई देण्यासाठी शासनाच्या महसूल, कृषी आणि पंचायत समिती या यंत्रणांच्या माध्यमातून सध्या पंचनामे सुरू आहेत. मात्र शासकीय कार्यवाही हि अतिशय संथगतीने सुरू असल्याने शिवसेनेच्या मदतीने आपण जिल्हाप्रमुख यांच्या सूचनेनुसार गावागावात जाऊन बाधित शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रत्येक शाखेत मतदान केंद्र सुरू करण्यात यावेत. एक ही शेतकरी सुटता कामा नये. या कामी बाधित भात शेतीचे फोटो, सातबारा यांचे फोटो काढून ते अपलोड करून घ्यावेत. तसेच सर्व शिवसैनिकांनी संबंधित शासकीय यंत्रणेकडे याबाबत पाठपुरावा करावा. अशा प्रकारचे मार्गदर्शन यावेळी सुभाष पवार यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
या वेळी जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती मिनाक्षी चंदे, उप जिल्हा प्रमुख सदाशिव सासे, तालुका प्रमुख वसंत लोणे, प्रवक्ता सुदाम पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुषमा लोणे, जयश्री सासे, युवासेना आल्पेश भोईर, पंचायत समिती सदस्य रमेश बांगर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भुषण जाधवसह अनेक शाखा प्रमुख, पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.