कसारा : कसारा येथील वनविभागाच्या जागेवर गोरगरीब नागरिकांनी बेकायदा बांधकामे केली होती. ती बांधकामे वनविभागाने गुरुवारपासून पाडायला सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे शेकडो नागरिक भयभीत झाले आहेत. उर्वरित कारवाई शुक्रवारपासून सुरू होणार होती. या कारवाईला विरोध करण्यासाठी शिवसेनेने उडी घेतली.शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषद सदस्य मंजूषा जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी वनविभागाविरोधात जनआंदोलन सुरू केले. सकाळी ८ पासून संपूर्ण कसारा परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरून कारवाईला विरोध करीत होते. या आंदोलनासाठी ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, जि.प. अध्यक्ष सुषमा लोणे यांनी आंदोलकांची भेट घेतली. आंदोलनास गालबोट लागू नये, यासाठी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तू भोये यांनी वनविभागाचे अधिकारी पी.बी. उबाळे-गुरचळे यांच्याशी चर्चा करून आंदोलनकर्ते यांच्यात समन्वय साधला. आंदोलकांचे शिष्टमंडळ व वनअधिकारी यांच्यात बैठक पार पडली. पाटील यांनी तत्काळ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. कसारा गावातील अतिक्रमण कारवाईबाबत माहिती दिली. या प्रकरणी शिंदे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाईस स्थगिती देण्याची सूचना केली. दरम्यान, यापुढे कोणीही अतिक्रमण करू नका, असे आवाहन पाटील यांनी ग्रामस्थांना केले. जी बांधकामे अस्तित्वात आहेत, ती पाडली जाणार नाहीत, असे आश्वासन दिले. दरम्यान, आंदोलनास राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. दरम्यान, आंदोलनास राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.कारवाईनंतर अनेक जण आजारीवनजमिनीवरील अतिक्रमण कारवाई सुरू झाल्याने अनेक ग्रामस्थ भयभीत झाले. या कारवाईमुळे अनेक जणांना हृदयविकाराचा त्रास झाला. कोणी रुग्णालयात दाखल झाले. आंदोलनाची सांगता झाल्यावर आमदार दौलत दरोडा यांनी पीडित ग्रामस्थांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. कसारा येथे जाऊन वनअधिकारी पी.बी. उबाळे-गुरचळे यांची भेट घेत कारवाई थांबवण्याबाबत चर्चा केली. प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.तानाजीनगर येथील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार नसून नागरिकांनी घाबरू नये. यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यायी तोडगा काढून अतिक्रमण नियमित करण्यासाठी प्रयत्न करू. - प्रकाश पाटील,शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुखवनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी सहा महिन्यांपासून या ग्रामस्थांना नोटिसा दिल्या जात आहेत. परंतु, नोटीस बजावूनही बेकायदा बांधकाम सुरूच असल्याने कारवाई करणे भाग पडले. - पी.बी. उबाळे, वनअधिकारी, विहीगाव, कसारा रेंज
बेकायदा बांधकाम कारवाईविरोधात सेनेची उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 1:28 AM