ठाणे : ठाण्यातील टोलमुक्तीसाठी मागील काही दिवसांपासून भाजप विरुद्ध मनसे असा सामना रंगला होता. आता त्यात शिवसेनेने उडी घेतली असून ठाणे मुलुंड टोलनाक्यासह मीरा भार्इंदर दहिसर टोलनाका स्थानिक वाहनांसाठी मोफत करावा अशी लक्षवेधी हिवाळी अधिवेशनात मांडण्याची तयारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने श्रेयाचे राजकारण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
आनंदनगर येथील टोलनाक्यावर एमएच ०४ या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये यासाठी मनसेने मानवी साखळी आंदोलन केले होते. दुसरीकडे भाजपचे ठाणे शहरचे आमदार संजय केळकर यांनी लवकरच एमएच ०४ च्या वाहनांना आनंदनगर टोलमुक्ती मिळेल, असे आश्वासन दिले होते. ते पाळले जात नसल्याने मनसेने दोन वेळा आंदोलन केले होते. ज्यावेळी २०१४ साली शिवसेना-भाजपचे सरकार आले तेव्हा त्या सरकारने टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र, ते केवळ आश्वासनच ठरले. त्यामुळे आता टोलमुक्तीसाठी श्रेयाची लढाई सुरू झाली आहे.
पाच किमी परिघात टोलमुक्ती नाहीच
शिवसेनेचे ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात थेट हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याची तयारी केली आहे. मीरा भार्इंदर महापालिका येथील दहिसर व ठाणे महापालिका हद्दीतील मुलुंड टोलनाक्यावर अनेक वर्षापासून विविध पक्षांची आंदोलने झाली आहेत. या दोन्ही शहरातील वाहनांना टोलमधून सवलत द्यावी, यासाठी आम्हीही आंदोलने केली. परंतु, त्यावर निर्णय झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ज्यावेळी टोलनाक्यांच्या निविदा प्रक्रिया करण्यात आल्या, त्यावेळी टोलनाक्यापासून पाच किमी परिसरातील रहिवाशांच्या वाहनांना या टोलमधून वगळण्याचा निर्णय झाला होता. निविदेतही तसे स्पष्ट करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असे सरनार्ईकांनी म्हटले आहे.