मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे मंगळवारी ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. कोरोनाशी त्यांची 13 दिवस चाललेली झुंज अखेर संपली. 47 वर्षांच्या आमगावकर यांचा उद्या 10 जून रोजी वाढदिवस होता.
भाईंदर पूर्वेच्या गोडदेव - न्यू गोल्डन नेस्ट - इंद्रलोक - फाटक भागातून 2012 साली ते निवडून आले होते . याच परिसराच्या प्रभाग 10 मधून आमगावकर हे 2017 साली पुन्हा नगरसेवक झाले . कोरोनाच्या संसर्ग काळात प्रभागातील नागरिकांना त्यांनी अन्न धान्य, भाजीपाला , जेवण उपलब्ध करून देण्यास ते जातीने फिरत होते. प्रभागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडू लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्या पासून परिसरात निर्जंतुकीकरण करणे, कंटेन्मेंट झोन मधील राहिवाश्यांना गरजेच्या वस्तू पुरवणे आदी कामात त्यांनी पुढाकार घेतला होता.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ते आई, पत्नी पूजा, भाऊ आदी कुटुंबियांना रायगड येथील गावी सोडण्यास गेले होते. परंतु तेथे प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्वाना घेऊन परत भाईंदरला आले. 27 मे रोजी त्यांना भीमसेन जोशी कोविड रुग्णालयात दाखल केले. सर्वांचे स्वाबचे नमुने घेतल्यावर त्यांना ठाण्याच्या होरायझन या खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले.
त्यांची पत्नी व भाऊ कोरोनातून बरे होऊन घरी परतले. पण आमगावकर व त्यांची आई उपचारासाठी रुग्णालयातच होते. आमगावकर यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारास त्यांचे शरीर प्रतिसाद देत नव्हते त्यातच त्यांच्या किडनीवर देखील परिणाम झाला. डॉक्टरांसह ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी आमगावकर यांच्या उपचारासाठी शक्य ते प्रयत्न केले . पण त्यात यश आले नाही .
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शहरात शोक व्यक्त होत आहे. ठाण्यातच त्यांच्यावर अंत्यविधी उरकण्यात आले . त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी पूजा, मुलगा प्रफुल्ल व मुलगी अंकिता असा परिवार आहे. त्यांच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत . आमगावकर यांच्या निधना बद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे , खासदार राजन विचारे , आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन , काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, महापौर ज्योत्स्ना हसनाळे सह विविध पक्षांचे नगरसेवक , पदाधीकारी, पालिका अधिकारी - कर्मचारी आदींनी दुःख व्यक्त केले आहे .
लढवय्या शिवसैनिक हरपला
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशीच गाव असलेले आमगावकर हे सामान्य कुटुंबातले . भाईंदरच्या गोडदेव गावात राहणारे शिवसैनिक पासून शाखा प्रमुख आणि नगरसेवक असा त्यांचा प्रवास देखील तळागाळातून पुढे आलेला . विनायक व तारा घरत यांचा त्यांना सुरवाती पासून पाठिंबा मिळाला . लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्यासह लोकांशी चांगला संपर्क ठेऊन होते . प्रभागात सक्रिय नगरसेवक म्हणून परिचित होते, ते स्थायी समितीचे सभापती होते . पालिका सभागृहात व बाहेर देखील शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे मांडत असत . हा लढवय्या शिवसैनिक कोरोना विरुद्धच्या युद्धात लोकांसाठी लढला पण स्वतःचे आयुष्य मात्र कोरोना समोर हरवून बसला अश्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या .