डोंबिवली : माजी लोकसभा अध्यक्ष व शिवसेनेचे नेते मनोहर जोशी हे मुलाखतकार या नव्या भूमिकेत आपल्याला दिसणार असून वेगवेगळ्या क्षेत्रांतील ज्या व्यक्ती जोशी यांच्या आतापर्यंत संपर्कात आल्या, त्यांच्या मुलाखतींवर आधारित नव्या पुस्तकाची जुळवाजुळव जोशी करत आहेत. या उपक्रमाकरिता मंगळवारी जोशी यांनी ख्यातनाम शिल्पकार सदाशिव साठे यांच्या एमआयडीसीतील शिल्पालयास भेट दिली व साठे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.दि. २ डिसेंबर रोजी जोशी यांचे हे नवे पुस्तक प्रकाशित होणार आहे. या पुस्तकांच्या निमित्ताने जोशी अनेक क्षेत्रांतील ज्येष्ठ व्यक्तींची भेट घेणार आहेत.लोकांनी कलेकडे वळावे, यासाठी काय करता येईल? कलेला सध्या दुय्यम दर्जा दिला जात आहे, त्यासाठी काय केले पाहिजे? असे प्रश्न जोशी यांनी साठे यांना विचारले. त्यावर साठे यांनी सांगितले की, शिल्पालयाला शाळेने भेट दिली पाहिजे.शालेय अभ्यासक्रमातील कला हा विषय बंद केला जाता कामा नये. कला विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे. त्यातून भावी कलाकार घडणार आहेत. केवळ परीक्षेतील गुणांसाठी कला हा विषय त्यांना शिकावू नये. माणूस आणि प्राणी यांच्यात एकच फरक आहे. माणसाच्या हातात कला आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला प्रगल्भता येते. कला ही जोपासली गेली पाहिजे. तरच, जीवनात समाधान मिळते. कलेची दृष्टी विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. कसे जगावे, यासाठी अनेक व्यवसाय आहेत. पण, का जगावे, यासाठी कला जोपासली गेली पाहिजे. सध्या इतर कलेला व्यासपीठ मिळत आहे. गायनाचे अनेक कार्यक्रम होतात, त्यामानाने शिल्पकला ही मागासलेली राहिली आहे. कलेकडे आस्थेने पाहिले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये शिल्पकलेची गोडी लावण्यासाठी शाळेने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी योजना आखली पाहिजे, असे ते म्हणाले. जोशी आपल्या पुस्तकानिमित्त विविध भागांना भेटी देणार आहेत.>मनोहर जोशी यांचे सदाशिव साठे यांच्याशी घनिष्ठ मैत्रीचे संबंध आहेत. साठे हे शिल्पकार असल्याने त्यांच्या क्षेत्राविषयी जाणून घेण्यासाठी जोशी यांनी त्यांची मंगळवारी सकाळी १0 वाजता भेट घेतली. साठे हे कल्याणला वास्तव्याला आहेत. परंतु, शिल्पालयातील त्यांच्या कलाकृतींमध्ये बसून त्यांच्याशी संवाद साधावा, या हेतूने जोशी यांनी शिल्पालयात भेट ठरवली. यावेळी त्यांचे चिरंजीव श्रीरंग साठे हेही उपस्थित होते. साठे यांची खरी ओळख ही शिल्पे हीच असल्याने दोघांनीही शिल्पालयात दिलखुलास गप्पा मारल्या. शिल्पकला विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्याची गरज सदाशिव साठे यांनी यावेळी अधोरेखित केली.
शिवसेना नेते मनोहर जोशी आता मुलाखतकाराच्या भूमिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 1:46 AM