अजित मांडके ठाणे : ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु आहे. त्यात काही दिवसांपूर्वी धर्मवीर आनंद दीघे यांनी खासदार राजन विचारे यांनी लिहीलेले पत्र चांगलेच चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर आता दीघे यांच्या पुण्यतिथी निमित्त विचारे यांनी आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत शिंदे गटावर बोचरी टीका केल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाण्यात आता शिंदे विरुद्ध विचारे असा सामना रंगणार असल्याचे चिन्हे निर्माण झाली आहेत. 'जेव्हा आपल्यांनीच केली गद्दारी आणि घात करून रातोरात झाले सत्ताधारी. गुरुवर्य तुम्ही म्हणजे अर्जुन घडवणारा द्रोणाचार्य खरा. ज्यांना घडवले तुम्ही त्यांनीच संघटनेचा केलेला अपमान नव्हे बरा आणि म्हणून आमचा आनंद हरपला,' असा संदेश व्हिडीओद्वारे देत विचारे यांनी पुन्हा शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचेच दिसत आहे.
दीड महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाले आणि राज्यात ठाकरे सरकार जाऊन शिंदे, फडणवीस सरकार राज्यात आले. मात्र येथूनच शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगण्यास सुरवात झाली आहे. अनेक आमदार, खासदार, नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले. मात्र काहींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. यात ठाण्याचे शिवसेनेचे खासदार विचारे यांचाही समावेश होता. सुरुवातीला त्यांनी या वादात न पडण्याचाच निर्णय घेतला होता. मात्र आता ते देखील उघड उघडपणे शिंदे गटावर टीका करु लागले आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना लिहलेले पत्र चांगलेच वायरल झाले होते. त्यानंतर आता नवीन व्हिडीओमुळे देखील सध्या शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
‘तुमचा प्रवास पाहायला गुरु वर्य (आनंद दीघे) आम्ही, याची देही याची डोळा. श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत ही तुम्ही धरली फक्त आणि फक्त सत्याची कास. अखंड शिवसेनेबद्दलची आस. त्याला आघात निष्ठेची साथ. तुम्ही म्हणजे अस्सल मातीतला माणसांसाठी लढणारा माणूस खरा. तुम्ही गेलात आणि शिवसैनिकांत पाझराला अश्रूंचा झरा व आज आमचा आनंदच हरपला’ असे विचारे यांनी चित्निफतीत म्हटले आहे.