ठाणे: सेलिब्रेटी तरुणीने कोविड सेंटरची कर्मचारी असल्याचे ओळखपत्र मिळवून कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे प्रकरण ठाणे शहरात चांगलेच गाजत आहे. याबाबत सर्व स्तरातून टीकेचा सूर उमटल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची ठाणे महापालिकेच्या आरोग्य उपायुक्त यांच्या समिती मार्फतीने चौकशी करण्याचे तसेच यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.
सध्या लसींचा तुटवडा असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी महापालिकेने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद केले आहे. असे असतांनाही ठामपाच्या पार्किग प्लाझा लसीकरण केंद्रात एका सेलिब्रिटी तरुणीने कोविड सेंटरची सुपरवायझर असल्याचे भासवून लस घेतल्याचे उघड झाले होते. या प्रकरणावरुन आता मनसेने देखील गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यातील बनावट ओळखपत्रांमागे मुंबईतील शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.
बनावट आयडी कार्ड प्रकरणी त्या कंपनीवर कारवाई होणार नाही, कारण या कंपनीमागे मुंबईतील शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात आहे. याच ओम साई आरोग्य केअर कंपनीने गेल्यावेळी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दीड लाख रुपये घेऊन बेड दिला होता, तेव्हा देखील डॉक्टरांवर कारवाई झाली, मात्र या कंपनीवर झाली नाही, आताही तेच होते आहे. या अभिनेत्री कंपनीच्या मालकाच्या मैत्रिणी नाहीत, त्या शिवसेना नेत्याच्या मैत्रिणी आहेत, असा दावाही अविनाश जाधव यांनी केला आहे. अविनाश जाधव यांच्या या आरोपानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलच तापणार असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस मिळविण्यासाठी कसरत करावी लागत असतांनाच सेलिब्रेटी तरुणीला मात्र ओमसाई आरोग्य केअर या ठेकेदार कंपनीने मात्र पार्र्किंग प्लाझाचे सुपरवायझरचे ओळखपत्र लसीकरणासाठी दिले. आता हे ओळखपत्र तिला कोणी दिले? तिला लस कशी दिली? या सर्वच प्रकरणाची आरोग्य उपायुक्तांमार्फत चौकशीचे आदेश आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिले आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये हा चौकशी अहवाल देण्यात यावा. चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
मालकावर गुन्हा दाखल करा- अविनाश जाधव
माझ्याकडे २१ जणांची यादी आहे. त्या यादीमध्ये अनेक हिरे व्यापारी आहेत. मुंबईतील विविध क्षेत्रातील व्यापारी देखील यामध्ये आहेत. त्यांना कंपनीने अॅडमीन म्हणून काम करत असल्याचे दाखविले आहे. एकाच कुटुंबातील ५ जण या कंपनीमध्ये काम करत असल्याचे दाखविण्यात आले आहे. माझा आरोप हा आहे की, ग्लोबल हॉस्पिटलचे जे मालक आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. कारण कर्मचाऱ्यांचं हे काम नाही. त्यांची मोठ्या सेलिब्रेटींसोबत ओळख नसते. तसेच या सर्व प्रकरणामागे शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोपही अविनाश जाधव यांनी 'लोकमत'शी बोलताना केला आहे.