कल्याण - शिवसेनाविरुद्ध भाजप, असा राजकीय संघर्ष सोमवारी केडीएमसीच्या महासभेत उफाळून आला. उपमहापौर उपेक्षा भोईर यांची बेकायदा बांधकामाची सभा तहकुबीची सूचना ऐेकण्याऐवजी आजारपणाचे कारण देत महापौर निघून गेल्या. दुसरीकडे गणसंख्या अपुरी असल्याचे कारण देत सचिवांनी सभा तहकूब करण्याचा पुकारा केला. त्यामुळे संतप्त झालेल्या भोईर यांनी शिवसेना व महापौर बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत आहे. त्यासाठी त्यांनी ही पळवाट शोधली आहे. शिवसेनेने शहराचा विकास करण्याऐवजी भकास केल्याचा आरोप केला. तसेच सभा तहकूब करा, मात्र मी उपमहापौर पदाचा राजीनामा देते, असे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, सभा तहकूब झाल्याने भाजप सदस्यांनी सभागृहाच्या बाहेर पडत ‘महापौर हाय हाय’च्या घोषणा देत महापौरांचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी उपमहापौरांना प्रवेशद्वाराजवळ गाठत शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला.महासभेला सुरुवातीला महापौर विनीता राणे होत्या. त्यानंतर त्यांना बरे वाटत नसल्याने त्यांनी सभेतून बाहेर जाणे पसंत केले. त्यामुळे त्यांच्या जागी उपमहापौर भोईर यांनी विराजमान होत कामकाज सुरू केले. सभेत दोन सभा तहकुबीच्या सूचना मांडून झालेल्या होत्या. आता महापौरपदी विराजमान असलेल्या उपमहापौर भोईर यांना बेकायदा बांधकामप्रकरणी सभा तहकुबीची सूचना मांडायची होती. मात्र, त्या पिठासीन अधिकारी असल्याने त्यांना ती मांडता येत नव्हती. त्या म्हणाल्या, ‘महापौर बाहेर बसून आहेत. केवळ त्यांनी त्यांची तब्येत ठिक नसल्याचे सांगून बाहेर जाणे पसंत केले आहे. तसेच शिवसेनेचे काही नगरसेवकही बाहेर बसलेले आहेत. त्यामुळे मला माझी सभा तहकुबी मांडायची आहे. त्यांनी सभागृहात यावे, मात्र त्या येणार नाही.’ तर, दुसरीकडे सभेला गणसंख्याही अपुरी झाली आहे. त्यामुळे सभा तहकूब करावी, असे सचिव संजय जाधव यांनी स्पष्ट करताच उपमहापौर संतप्त झाल्या.आपली राजकीय कोंडी केली जात असल्याचे पाहून भोईर यांनी शिवसेनेवर पिठासीन अधिकारीपदावरून निशाणा साधला. भोईर यांच्या दालनात काही दिवसांपूर्वी बेकायदा बांधकामधारकाने घुसून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. आता बेकायदा बांधकामांची तहकूबी घेतली असता त्याला साथ देण्याऐवजी शिवसेना व महापौर पळपुटेपणा करीत आहेत. शिवसेना व महापौर बेकायदा बांधकामांची पाठराखण करीत आहे. प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांच्याविरोधात कारवाई केली नाही. हाच धमकीचा प्रकार महापौरांच्या बाबतीत त्यांच्या दालनात झाला असता तर शिवसेना गप्प बसली असती का, तेव्हा शिवसेनेकडून अधिकाऱ्याची पाठराखण केली गेली असता का, असा संतप्त सवाल करत शिवसेना नेहमीच नाटके करते. भाजपला दुय्यम वागणूक देते. शिवसेनेने शहराचा विकासाऐवजी भकास केल्याचा आरोप केला. भाजप सरकारने स्मार्ट सिटीसाठी ३१९ कोटी रुपये महापालिकेस दिले आहेत. मात्र, स्मार्ट सिटीचे एकही काम दृश्य स्वरूपात महापालिका हद्दीत दिसत नाही.त्यावेळी त्यांच्या वक्तव्याला हरकत घेण्याशाठी शिवसेनेचे सदस्य पुढे सरसावले. तसेच शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महापौरांच्या बाबतीत अनुद्गार काढू नका. हे तुम्हा शोभा देत नाही, असे सांगत महापौरांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मी माझ्या उपमहापौरपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त, सचिव व महापौरांकडे देणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.‘ते’ कोणत्या अधिनियमात आहे?यासंदर्भात महापौर राणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, उपमहापौरांच्या सभा तहकुबीच्या सूचनेवेळी मी निघून गेले असे नाही. मला बरे वाटत नसल्याने सभागृह नेते श्रेयस समेळ यांच्या तहकुबी सूचनेच्या वेळीच मी बाहेर पडले होते. भोईर यांच्या तहकुबीवर चर्चा न करण्याचा काही एक हेतू नव्हता. चर्चा करायची नसती तर तहकुबी दाखल करूनच घेतली नसती. सभागृह व प्रशासन चर्चेला तयार होते. त्यांनी चर्चा करायला हवी होती.पिठासीन अधिकारीपदी बसल्यावर सभा तहकुबी मांडता येत नाही, असे महापालिकेच्या कोणत्या अधिनियमात आहे. असा कोणताही अधिनियम नसताना केवळ शिवसेनेच्या नावाने भाजपला शिमगा करायची सवय आहे. शिवसेनेने शहराचा विकास केला नाही हे आता सदस्य मंडळाच्या शेवटच्या वर्षी व महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यावर समजले आहे. या आधीच पदाचा राजीनामा द्यायचा होता. शिवसेनेने विकास केला की, भकास हे जनता ठरवील. ते भाजपने सांगण्याची गरज नाही.
शिवसेना, महापौर बेकायदा बांधकामांच्या पाठीशी ? उपेक्षा भोईर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 1:16 AM