लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्याच्या इतिहासात भाजप आणि शिवसेनेच्या युतीमुळेच शिवसेनेचा महापौर आतापर्यंत झाला. मात्र, आता हे चित्र बदललेले सर्वांना दिसणार असून ठाण्याचा आगामी महापौर भाजपचाच बसणार, असा विश्वास पक्षाचे ठाणे प्रभारी आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
कोपरी येथे भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महायज्ञाचे आयोजन केले आहे. शनिवारी शेलार देवीच्या दर्शनासाठी आले असताना त्यांनी हे विधान केले. तसेच ठाण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना लोकांमध्ये जाऊन समाजसेवा करण्याचा सूचना या वेळी शेलार यांनी दिल्या.भंडारा येथील घटना अतिशय दुर्दैवी असून तिची सात दिवसांत चौकशी करून दोषींना कडक शासन झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
महाविकास आघाडीत पहिल्यापासून बिघाड आहे. सकाळ बिघाड, दुपार बिघाड, संध्याकाळ बिघाड, रात्री बिघाड आणि बिघडलेली आघाडी असल्याने यांनी या राज्याला बिघडवू नये एवढीच आमची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. नामांतर वादावरूनही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.