ठाणे : संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आधीच कोरोनामुळे धडकी भरली आहे. त्यात आता महावितरणने पाठविलेल्या वीज बिलांमुळे या नागरिकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या काळात वीज कंपन्यांनी सामान्य जनतेला पाठवलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे सामान्यांना ४४० व्होल्टचा शॉक दिल्याची खरमरीत टीका सत्ताधारी शिवसेनेचे ओवळा-माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दिलासा देण्याची मागणी त्यांनीे केली आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग-धंदे ठप्प झाल्यामुळे अथवा अनेक ठिकाणी बंद झाल्यामुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. खर्च जे टाळले जाऊ शकत नाहीत ते पोटाला चिमटा काढत कसाबसा संसाराचा गाडा या कठीण परिस्थिती पुढे ढकलायचा प्रयत्न करत असतांनाच, वीज कंपन्यांनी मात्र त्याला बिलाच्या माध्यमातून शॉक दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.