ठाणे : ठाणे शहरातील बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर मुंबईतील गिरणी कामगारांच्या धर्तीवर ५०० फुटांची घरे व त्याठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शनिवारी वर्तक नगर येथील बिर्ला कंपनीच्या गेटवर आंदोलन केले. परंतु त्याच वेळेस त्यांच्या पक्षातील माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी देखील कंपनीच्या आतमध्ये आंदोलन केल्याचे दिसून आले. केवळ आम्हाला याठिकाणचे काम मिळाले असल्याने तेच खुपल्याने आमदारांनी हे आंदोलन केल्याचा आरोप बारटक्के यांनी केला आहे. परंतु स्थानिकांना न्याय मिळावा या हेतून हे आंदोलन केल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
राज्यात सत्तातंर झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर आता शिवसेना विरुध्द उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात रणसंग्राम सुरु झाला आहे. परंतु आता शिंदे गटातीलच आमदार आणि माजी नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. वर्तकनगर भागात बिर्ला कंपनी बंद असून त्याठिकाणी विकासकाच्या माध्यमातून काम सुरु झाले आहे. याठिकाणी आम्ही स्थानिक याच नात्याने दोन वर्षापूर्वी काम घेतल्याचा मुद्दा बारटक्के यांनी उपस्थित केला. त्यानंतर आम्ही स्थानिकांना न्याय देण्याचे कामही केले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. परंतु याठिकाणी गिरणी कामगारांच्या धर्तीवर घरे देण्याचा मुद्दा आमदार उपस्थित करीत असतील तर त्याचा आम्हाला आनंद आहे. मात्र स्थानिकांना न्याय मिळावा या हेतून हे आंदोलन नसून स्वत:च्या फायद्यासाठी आंदोलन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मागील कित्येक वर्षापासून याठिकाणी काम मिळविण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे. परंतु आता तेच आमदारांना खुपत असल्याने त्यांना न्याय हवा असेल तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. अशा चुकीच्या पध्दतीने आंदोलन करणे अयोग्य असल्याचेही ते म्हणाले.
मात्र दुसरीकडे सरनाईक यांनी स्थानिकांना न्याय मिळावा, कंपनी बंद पडलेल्यांना रोजगार मिळावा, त्यांना घरे मिळावीत या उद्देशाने हे आंदोलन केले असल्याचा दावा केला आहे. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील चर्चा केली जाणार असून सत्तेत असतांनाही सत्ताधारी पक्षातील आमदाराला अशा पध्दतीने आंदोलन करावे लागते हे दुर्देवी असल्याचेही ते म्हणाले. परंतु कामगारांच्या हितासाठी लढायला देखील तयार असल्याचे ते म्हणाले. त्यानुसार पुढील १५ दिवसात यावर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. मात्र तसे न झाल्यास १ म अर्थात कामगार दिनाच्या दिवशीच प्रत्येक बंद कंपनी बाहेर साखळी उपोषण केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
सरनाईक विरुध्द बारटक्केसरनाईक आणि बारटक्के यांच्यातील हा पहिलाच वाद नसून यापूर्वी देखील त्यांच्यात अनेक मुद्यावरुन खटके उडाल्याचे दिसून आले आहेत. परंतु आता राज्यात सत्ता आल्यानंतर याला विराम लागेल अशी अपेक्षा असतांना त्यांच्यात पुन्हा वाद पेटल्याचे दिसत आहे.