डोंबिवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी कल्याण ग्रामीण मतदार संघातील इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ (म्हाडा) अध्यक्ष विनोद घोसाळकर, कल्याण ग्रामीण माजी आमदार सुभाष भोईर, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी उत्तरशिव गावात भात शेतीची मंगळवारी पाहणी केली .
परतीच्या पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी. तसेच भात शेतीचे पंचनामे झाले की नाही? पीक विमा काढण्यात आला आहे का? यासंबंधीची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, कल्याण ग्रामीण युवा सेना अधिकारी योगेश म्हात्रे, उपविभाग प्रमुख बाळाराम पाटील, राम भोईर, कैलास यंदारकर यांच्या सह गावकरी उपस्थित होते.
दरम्यान, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशीही घोसाळकर यांनी चर्चा केली, त्यावेळी शेतकऱ्यांनी शेताच नुकसान झाले. पीक डोळ्यासमोर वाया गेले, वर्षभर खायच काय? मुलांची शिक्षण संसार उघड्यावर पडायची वेळ आली आहे, असे सांगत काहीतरी तोडगा काढावा आणि नुकसान भरपाई तुटपुंजी मिळू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असल्याचे भोईर यांनी सांगितले.