Rajan Vichare Emotional Letter to Dharmaveer Anand Dighe ठाणे, लोकमत न्यूज नेटवर्क: शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद निर्माण झाला आहे. दुसरीकडे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करीत दिवंगत आनंद दिघे यांनाच भावनिक साद घालणारे पत्र लिहिले आहे. पहिल्यांदा सत्ता देणाऱ्या ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय मग गद्दारांना कसं माफ करायचे असा सवाल करणाऱ्या या पत्राने ठाण्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
रविवारी सोशल मिडियावरुन जोरदार व्हायरल झालेल्या या पत्रामधून खासदार विचारे यांनी ही खदखद व्यक्त करीत कोणत्याही पदापेक्षा वैयक्तिक स्वार्थापेक्षा संघटना महत्वाची, पक्ष महत्वाचा तुमची ही शिकवण मानाने मिरवत पुढे घेऊन जाणार आहे. विचारे यांच्या पत्रामुळे ठाण्यातील राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे. शिवसेनेतील आमदारांच्या बंडामुळे शिंदे आणि ठाकरे यांच्यात चांगलाच सामना रंगला आहे. शिंदे गटाने समर्थकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे. तर, दुसरीकडे मातोश्रीवर देखील प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे पोहोचत आहेत. एकनाथ शिंदे हे सतत धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेत आहे. दिंघे यांच्यासोबत काय घडले हेही सांगेल, असेही ते म्हणाले होते. अशातच आनंद दिघे यांचे शिष्य व ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनीही आता आनंद दिघे यांना भावनिक साद घालणारे पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे सत्ता करणावर भाष्य करीत जुन्या आठवणीना उजाळा दिला आहे.
या पत्राच्या सुरुवातीलाच, साहेब आज तुमची खूप आठवण येतेय, असे म्हटले आहे. वयाच्या सोळाव्या वषार्पासून तुमच्यासोबत काम करत आलो. या सगळ्या प्रवासात साहेब तुम्ही होता. आजच्या इतका कधीच अस्वस्थ नव्हतो. कारण, आजच्या घटनेमुळे शिवसैनिकांसह शिवसेना बघितलेला सामान्य मराठी माणूसही अस्वस्थ झाला आहे. कुठल्या तोंडानं सांगू घात झाला साहेब. घात झाला. तो पण आपल्याच लोकांकडून, शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात विजयाची नांदी आपल्या ठाण्यात झाली होती. तेव्हा तुमची ५६ इंचाची छाती अभिमानाने भरलेली पाहिली, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पुढे पत्रात लिहिले आहे की, साहेब ज्या ठाण्यावर तुम्हाला अभिमान होता.... महाराष्ट्रात ज्या ठाण्याने आपल्याला पहिल्यांदा सत्ता दिली. आज त्याच ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय, छातीवर नाही तर पाठीवर वार झाला. या आधी जेव्हा असे झाले होते, तेव्हा गदारांना क्षमा नाही हे तुम्हीच बोलला होता ना. आज हे दुसऱ्यांदा झालय.पण तुम्ही नाही आहात मग यांना कसं माफ करायचं आम्ही, असे देखील विचारे यांनी पत्रात म्हटले आहे. आनंदाश्रमाकडे पाहिलं आणि डोळ्यात पाणी आलं. याच मंदिरात आम्हा सगळ्यांना शिवबंधन बांधलं होत तुम्ही..... आज तेच बंधन माझ्या डोळ्यासमोर तुटताना बघतोय म्हणून गहिवरून येत आहे. पण रडायचं नाही. लढायचं हा विचार येऊन पुढे जाणारी संघटना आहे आपली. तुमचे सगळे सच्चे शिवसैनिक आहेत. आम्ही जीवाची बाजी लावू पण शिवसेनेचे ठाणे.... ठाण्याची शिवसेना हे ब्रीद पुसू देणार नसल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.