ठाणे: मुंब्रा, कौसाच्या बाह्यरस्त्याच्या मुद्यावरुन आता राष्ट्रवादी आणि शिवसेना पुन्हा आमने सामने आली आहे. ज्या रस्त्याच्या दुरुस्तीची मंजुरी आधीच मिळाली त्या रस्त्यासाठी आता शिवसेना स्वत: रस्त्यावर उतरुन खड्डे बुजविण्याचे काम करीत असल्याची चर्चा सोमवारी दिवसभर होती. त्यातही हा मार्ग भेदण्यासाठी पालकमंत्र्यांनी उन्नत मार्गाची घोषणा केल्याने आता येथील वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे या रस्त्याच्या कामासाठी वांरवांर सभागृहात आवाज उठविला असून त्यानुसारच हे काम करण्यात येत असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. त्यामुळे सुरूवातीपासूनच चर्चेत असलेला मुंब्रा बाह्यवळण मार्ग आता पुन्हा राजकीय पक्षांच्या केंद्रस्थानी आल्याने येत्या काळात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.
मुंब्य्राच्या निमुळत्या रस्त्यातून वाहनचालकांनी कोंडी सुटावी यासाठी मुंब्रा बाह््यवळण मार्गाची उभारणी करण्यात आली. परंतु काही महिन्यातच या मार्गाच्या बांधणीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले. तेव्हा पासून आजही हा रस्ता नेहमीच राजकीय वादाचा विषय ठरला आहे. असे असले तरी उरणच्या जेएनपीटी बंदरातून ठाणो, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहने याच मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे या मार्गांवर अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. या मार्गावर सुरु असलेली पथकर वसुली काही वर्षांपुर्वी बंद करण्यात आल्यानंतर या मार्गाची आणखी दुरावस्था झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात या मार्गावर खड्डे पडल्याने याठिकाणी अवजड वाहतूक संथगतीने सुरु होती. यामुळे रेतीबंदरपासून शीळफाट्यापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे या मार्गाला जोडणा:या ठाणो, कळवा, शीळफाटा, कल्याण आणि म्हापे भागातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊन त्याठिकाणीही वाहतूक कोंडी होत आहे. मध्यंतरी या मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने आंदोलन केले होते आणि त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या माध्यमातून तेथील खड्डे बुजवून घेतले होते.
दरम्यान आता या रस्त्याच्या मुद्यावरुन पुन्हा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंब्रा बाह््य वळण मार्गावरील वाहतूक कोंडी भेदण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उन्नत मार्ग उभारण्याची घोषणा केली असतानाच या मार्गाच्या दुरु स्तीसाठी राष्ट्रवादीने सोमवारी पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले. एकीकडे मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या दुरु स्तीसाठी राष्ट्रवादीने पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला असतानाच दुसरीकडे मुंब्रा बाह््यवळण मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्याची चर्चा शहरात सुरु होती. मात्र, ठाणो आणि मुंबईतील कार्यक्रमांमध्ये ते व्यस्त असल्याने सोमवारी त्यांनी असा कोणताही पहाणी दौरा नसल्याचे पालकमंत्री यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
दरम्यान या रस्त्याच्या मुद्दा वारंवार सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मागणीनुसार या रस्त्याच्या कामाच्या दुरुस्तीच्या निविदा काढण्यात आल्या. त्यानुसार येत्या नोव्हेंबर 2017 अखेरीस येथील दुरुस्तीचे काम पूर्ण होईल असे लेखी आश्वासन राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल विभागाने लेखी स्वरुपात कळविले असल्याची माहिती आमदार आव्हाड यांनी दिली आहे. तसे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामही डिसेंबर्पयत पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी केवळ एमएसआरडीसीच्या रस्त्यांकडे लक्ष द्यावे येथील रस्ते करण्यासाठी मंत्री चंद्रकात पाटील हे सक्षम असल्याची बोचरी टिकाही आव्हाडांनी केली आहे.