ठाणे : ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणे हे कोणीही तोडू शकत नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राऊत यांनी मनोरमानगर येथील कार्यक्रमात हजेरी लावली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
खासदार राऊत म्हणाले की, ही शिवजयंती शिवसेनेचीच आहे. याच छत्रपतींच्या विचाराने बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. तेव्हापासून ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणे हे नाते आहे. ते कोणीही तोडू शकणार नाही. ठाणे हे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याच मागे ठामपणे उभे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना २८० लढाया लढाव्या लागल्या. त्यातील दोनशे लढाया या स्वकीयांविरुद्धच्या होत्या.
आता हेच आपण ठाणे शहरात पाहत आहोत. आता फक्त मतदानाचीच वाट शिवसैनिक पाहत आहेत. याच ठाण्याने बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला पहिली सत्ता दिली. ते ठाणे कधीही बेईमानी करणार नाही. बेईमानांचा समाचार घ्या. अनेक अफजल खानांचे कोथळे इतिहासात पाहिले. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना अद्दल घडवू, त्यांचा सूड घेऊ ही जिद्द कायम ठेवा, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.
यावेळी खासदार राजन विचारे यांच्यासह ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, जनता शिवसेनेबरोबर आहे. पोलिसांच्या माध्यमातून शाखा ताब्यात घेतल्या जात असल्या तरी शिवसैनिकांची जिद्दच शिवसेनेला विजयाकडे नेईल, असा विश्वासही खा. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
शिवाईनगरात शांततेत शिवजयंतीहोळीच्या दिवशी शिवाईनगरातील शाखा ताब्यात घेण्यावरून शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते. शुक्रवारी मात्र, या दोन्ही गटातून वेगवेगळ्या ठिकाणी शिवजयंती शांततेत आणि उत्साहात साजरी करण्यात आली.