ठाणे : शिवसेना प्रभाग क्रमांक १९च्या वतीने रक्तदान आणि प्लाझ्मा पूर्वचाचणी शिबिराचे आयोजन शनिवारी महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने करण्यात आले होते. शिबिरात ७५ दात्यांनी रक्तदान केले, तर २६ जणांनी प्लाझ्मा दानाची पूर्वचाचणी केली.
ठाणे शहरात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णांना जीवदान द्यायचे असेल तर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान आणि प्लाझ्मादानासारख्या राष्ट्रकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक विकास रेपाळे आणि वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले - जाधव यांनी आवाहन करीत रक्तदान शिबिर आणि प्लाझ्मा चाचणीचे आयोजन केले. शिवसेना प्रभाग क्रमांक १९ वतीने ठाण्यातील कशिश पार्क, क्लब हाऊस येथे हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये अनेकांनी प्लाझ्मा देण्यासाठी आपल्या नावांची नोंद केली. यावेळी ७५ दात्यांनी रक्तदान केले. २६ जणांनी प्लाझ्मादानाची पूर्वचाचणी केली आहे. या शिबिरासाठी लोकमान्य टिसा ब्लड बँक यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.