ठाणे : ओवळा-माजिवडा मतदारसंघाचा गड शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आ. प्रताप सरनाईक यांनी ‘सर’ करीत या मतदाससंघातील विजयी हॅट्ट्रिक साधली. सरनाईकांना एक लाख १७ हजार ५९३ मते पडली असून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रांत चव्हाण यांचा ८३ हजार ७०४ मतांनी पराभव केला. सरनाईकांनी हा विजय ठाणे आणि मीरा-भार्इंदर येथील शिवसैनिक समर्पित केला.
ठाणे आणि मीरा-भार्इंदर महापालिकेत विभागलेल्या ओवळा-माजिवड्यात या निवडणुकीत सर्वाधिक मतदारांची नोंद झाली होती. सुशिक्षितांचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात यंदा मतदानाची टक्केवारी घसरली होती. त्यातच, या मतदारसंघातून १४ उमेदवार उभे राहिले होते. चार लाख ४९ हजार ६०२ पैकी एक लाख ९३ हजार २१२ मतदारांनीच आपला हक्का बजावला होता.
२००९ आणि २०१४ च्या निवडणुकांपेक्षा यावर्षी कमी मतदान झाले असताना, एक लाख १७ हजार २८९ मतदात्यांनी सरनाईकांच्या पारड्यात मते टाकली तर, काँग्रेसचे चव्हाण यांना ३३ हजार ५८५ मते मिळाली. मनसेचे उमेदवार संदीप पाचंगे यांना २१ हजार १३२मते मिळाली आहेत. सहा हजार ५४ मतदात्यांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. पहिल्या फेरीपासून सरनाईकांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत राखली. त्यातच, टपाल मतदानातही सरनाईकांना सर्वाधिक ३०४ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढतीऐवजी एकतर्फी लढत पाहायला मिळाली.
गेल्या निवडणुकीमध्ये १० हजार मतांनी निवडून आलो. यावेळी मतदारांनी मला मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिले आहे. त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न मागता खूप काही दिले असून मंत्रीपदाची मला अपेक्षा नाही. मतदारसंघातील कोंडी आणि पाण्याची समस्या सोडवण्यास प्राधान्य देणार आहे.- प्रताप सरनाईक, ओवळा-माजिवड्यातील शिवसेनेचे विजयी उमेदवार
प्रचारासाठी कमी वेळ मिळाला. मात्र, ज्या मतदारांनी मला मतदान केले, त्यांचे आभार मानतो. काँग्रेसचे मतदान वाढले असून शिवसेनेच्या उमेदवाराचे मतदान घटले आहे.- विक्रांत चव्हाण, काँग्रेस
मतदारांचा कौल मला मान्य आहे. उमेदवारी घोषित करण्यासाठी उशीर झाल्याने फार कमी कालावधी प्रचारासाठी मिळाला. मात्र, जे मतदान झाले, त्या मतदारांचे आभार.- संदीप पाचंगे, मनसे