सदानंद नाईक/ उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील शांतीनगर, कैलास कॉलनी, आंबेडकरनगर, करोतीयानगर आदी परिसरातील शेकडी नागरिकांनी शिवसेना शिंदे गट नेत्यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढला. यावेळी संतप्त महिलांनी पाण्यासाठी महापालिका विरोधात घोषणाबाजी करून नियमित पाणी देण्याची मागणी केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरातील शांतीनगर, कैलास कॉलनी, डॉ बाबासाहेब आंबेडकरनगर, करोतियानगर आदी परिसरात गेल्या १५ दिवसापासून पाणी टंचाई निर्माण झाली. पाणी टंचाईबाबत महापालिका पाणी पुरवठा विभागाला सांगूनही पाणी पुरवठा नियमित झाला नाही. एका पाण्याच्या हंड्यासाठी महिलांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. अखेर शुक्रवारी दुपारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक नाना बागुल यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर शेकडो महिलांचा हंडा मोर्चा काढला. शहरातील एमआयडीसी दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होत असून लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी पुरवठा पुरेशा आहे. असे असतानाही शहरातील विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाली. महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अभियंता परमेश्वर बुडगे यांच्याकडे लेखी तक्रार करूनही दुर्लक्ष करीत असल्याचे नाना बागुल यांचे म्हणणे आहे.
अखेर स्थानिक नागरिकांनी शिवसेना शुंडे गटाचे जिल्हा समन्वयक नाना बागुल, माजी नगरसेवक अंकुश म्हस्के, स्वप्नील बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. महापालिका आयुक्त अजीज शेख यांना बागुल यांनी निवेदन दिले असून पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी केली. परिसरात अवैधरित्या ६ इंचाची नळजोडणी दिल्यामुळे परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती बागुल यांनी दिली. त्यामुळे अवैध नळजोडणी काढावी, वॉलमन नियमित ठेवणे आदी मागणीही त्यांनी केली आहे.