नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी पंचायत समिती उपसभापती पदी कोनगाव गणातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या शिला नंदकुमार राखाडे यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पंचायत समिती उपसभापती प्रगती पाटील यांनी आपापसात ठरल्या प्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्तपदासाठी भिवंडीचे अप्पर तहसीलदार किशोर मराठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीत शिला राखाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने पिठासीन अधिकारी मराठे यांनी राखाडे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. राखाडे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी नवनिर्वाचित उपसभापती शिला राखाडे यांची भेट घेऊन त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दरम्यान वरिष्ठांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण निश्चितच योग्य पद्धतीने पार पडणार असून तालुक्यातील महिला व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी प्रतिक्रिया उपसभापती शीला राखाडे यांनी दिली आहे.
यावेळी माजी सभापती विकास भोईर, , माजी सभापती ललिता प्रताप पाटील, पंचायत समिती सभापती अविता भोईर, गट विकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे , नायब तहसीलदार महेश चौधरी , सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश मोहिते यांच्यासह पंचायत समिती सदस्य, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.