उल्हासनगर : शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख दिलीप गायकवाड यांनी गेल्या महिन्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते त्यांना उपजिल्हाप्रमुख पदी निवड केली. तर ठाकरे गटातील युवाअध्यक्ष राहिलेले बाळा श्रीखंडे यांची उपशहरप्रमुख पदी जिल्हाप्रमुखांनी नियुक्ती केली.
उल्हासनगर शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख दिलीप गायकवाड यांनी गेल्या महिन्यात समर्थकासह मुख्यमंत्री व पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. गायकवाड यांची उल्हासनगर महानगर उपजिल्हाप्रमुख पदी पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते नियुक्ती केली. तर शिवसेना ठाकरे गटाचे शहरयुवा अध्यक्ष पदी राहिलेले बाळा श्रीखंडे यांची उपशहरप्रमुख पदी जिल्हाप्रमुख लांडगे यांनी नियुक्ती केली. गायकवाड व श्रीखंडे यांच्या नियुक्तीनंतर पक्ष वाढण्याची शक्यता लांडगे यांनी व्यक्त केली.
तत्कालीन शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी एकाच गुन्ह्यात अपहरण, खंडणी आदी १९ गुन्हे मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर, त्यांना अटक होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र गुन्हा दाखल झाल्यावर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन समर्थकासह पाठींबा दिला. त्यानंतर त्यांनी धुमधडाक्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला. त्यांच्याकडे उल्हासनगर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी दिली. शिवसेना ठाकरे गटासह अन्य पक्षातील अनेकजण पक्षात प्रवेश घेण्यास इच्छुक असल्याची माहिती पक्षाचे स्थानिक नेते देत आहेत. तर चौधरी यांच्याकडे अन्यजनाच्या पक्ष प्रवेशाची जबाबदारी दिली असल्याचे बोलले जात आहे.