मीरारोड - शिवसेना शिंदे गटाच्या कंटेनर शाखां विरुद्ध तक्रारी करत कारवाईची मागणी करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख मंडळींच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी आता शिंदे गटाने आयुक्तांना भेटून लेखी पत्राद्वारे केली आहे . त्यामुळे दोन्ही गटातील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते भाईंदर पूर्व व मीरारोड भागात कंटेनर ठेऊन शिवसेना शाखांचे उदघाटन करण्यात आले आहे . तर सार्वजनिक रस्ता , पदपथ ठिकाणी अनधिकृतपणे कंटेनर ठेऊन ह्या शाखा सुरु केल्याने त्यावर कारवाई करा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटासह मनसे , काँग्रेस , भाजपाने केली . सोमवारी ठाकरे गट , मनसे व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे मोठ्या संख्येने जमून महापालिका आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन कंटेनर शाखांवर कारवाईची मागणी केली होती.
त्याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजू भोईर व महिला संघटक निशा नार्वेकर सह विक्रम प्रताप सिंह , राजू वेतोस्कर , पूजा आमगावकर , सचिन मांजरेकर , कमलेश भोईर , विकास पाटील आदींनी महापालिकेत आयुक्तांची भेट घेतली . यावेळी आयुक्तांना लेखी पत्र देऊन त्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची नावे न टाकता त्यांच्या बांधकामांची तक्रार केली गेली .
पेणकरपाडा येथे दालमिया शाळेसमोरील महानगरपालिकेच्या आरक्षित भुखंडावरती सर्व्हिस सेंटर , गॅरेज , हॉटेल , गाळे आदी अनधिकृत बांधकामे. तुंगा रुग्णालय जवळ हॉली कॉम्प्लेक्स इमारतीच्या पहिल्या माळ्यावर गच्ची वर अनधिकृत बांधकाम व लोखंडी जीना. नवघर गाव, इंद्रप्रस्थ डी येथील जनसंपर्क कार्यालया समोरील वाढीव शेड बांधकाम. रामदेव पार्क शेजारील जागेत काजल ग्राउंड येथे अनधिकृत बांधकाम करून विनापरवाना विविध कार्यक्रमासाठी जागा भाडेतत्वावर देणे . प्रभाग क्र. १६, सृष्टी येथील कोस्टल हॉटेलच्या बाजूला मोकळ्या जागेत अनधिकृत बाईक शोरूम. नवघर, सरस्वती नगर येथील सचिन तेंडुलकर मैदानाच्या शेजारी कार पार्किंग करण्याकरिता स्थानिक नागरिकांकडून अनधिकृतपणे वसुली करून नागरिकांना वेठीस धरणा-यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे . हि सर्व बांधकामे शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संबंधित आहेत .