अजित मांडके, ठाणे: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारांना परत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडत असताना दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना शिंदे गटाचे काही खास शिलेदार पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या घरी आलेल्या मंत्री आणि आमदारांनी नाराजी केली व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीसोबत गेल्याने जुने वाद पुन्हा होण्याची शक्यता असल्याचे या मंत्री तसेच आमदारांनी व्यक्त केली आहे. याशिवाय रायगड, नाशिक, सातारा जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये मतभेद आहेत, असेही या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन या मंत्री तसेच आमदारांना दिल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असलेल्या मतभेदांबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मध्यास्तीचा मार्ग शोधणार असल्याचेही सांगितले जात आहे. यासंदर्भात संध्याकाळी वर्षा निवासस्थानी बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संदीपान भूमरे, दादा भुसे, तसेच संजय शिरसाट, संजय बांगर, प्रकाश सुर्वे उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली आहे.