डोंबिवली : शिवसेनेची २० वर्षांपासून सत्ता असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळवले आहे. सरपंचपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार हनुमान ठोंबरे सात मते मिळाली. तर शिवसेनेचे पारडे जड असतानाही त्यांचे उमेदवार योगेश ठाकरे यांना अवघी दोन मते मिळवता आली.११ सदस्यांच्या या ग्रामपंचायतीत शिवसेनेचे सहा तर भाजपाचे पाच सदस्य होते. त्यात यंदाच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन महिला सदस्यांचे अपहरण तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपाचे केडीएमसीचे नगरसेवक महेश पाटील यांना अटक व सुटका झाली होती. यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि रंगतदार बनली होती. संख्याबळाच्या तुलनेत शिवसेनेचे पारडे जड असले, तरी शिवसेनेचे दोन सदस्य गैरहजर राहिले, तर दोघांनी थेट भाजपालाच मतदान केले. त्यामुळे भाजपाच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.ठोंबरे मोठ्या मतांनी विजयी झाले असले तरी पक्षभेद विसरून एकत्र काम करणार असल्याचे भाजपातर्फे सांगण्यात आले. विजयाचे श्रेय सदस्य, कार्यकर्ते आणि नगरसेवक पाटील यांना जाते असेही ठोंबरे म्हणाले. या वेळी नगरसेवक पाटील, डॉ. सुनीता पाटील, खुशबू चौधरी, साई शेलार ,उपमहापौर मोरेश्वर भोईर, कल्याण सरचिटणीस शिवाजी आव्हाड, सुजित नलावडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेला धक्का, खोणी ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 2:23 AM