उल्हासनगर : शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल होताच, अटकेच्या भीतीने त्यांनी शिंदे गटाचा मार्ग निवडला. सिर सलामत तो पगडी पचास असे बोलून चौधरी यांनी समर्थकासह शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुभेच्छा भेट घेतली आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व होते. दरम्यान शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना गुरवारी रात्री ९ वाजता मध्यवर्ती पोलिसांनी एका गुन्ह्याची चौकशी प्रकरणी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. शुक्रवारी दुपारी १ वाजे पर्यंत असे एकून १४ तास चौधरी यांची चौकशी करून सोडून देण्यात आले. मात्र त्याच मध्यरात्री राजेंद्र चौधरी यांच्यासह १५ जणांवर आदिवासी महिलेची जमीन हडपने, अपहरण, फसवणूक, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल केले. गंभीर गुन्हे दाखल होऊनही चौधरी यांना पोलिसांनी का सोडले?. असा प्रश्न शिवसैनिकासह नागरिकांना पडला. मात्र दुसऱ्याच दिवशी चौधरी यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांची शनिवारी रात्री समर्थकासह भेट घेऊन पाठिंबा दिला. चौधरी यांचा समर्थकासह मोठ्या धुमधडाक्यात जाहीर प्रवेश होणार आहे.
राजेंद्र चौधरी यांना मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्या बाबत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सदिच्छा भेटी बाबत विचारले असता, शिवसेना ठाकरे पक्षात कोंडी झल्याने, शिंदे गटाचा मार्ग निवडल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच सिर सलामत तर, पगडी पचास. असे समर्पक उत्तर दिले. या गंभीर गुन्ह्यात आपले राजकीय भविष्य पणाला लागले असते. आपल्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे असून यामध्ये आपल्याला राजकीय दृष्ट्या गुंतविल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे. गंभीर गुन्हे प्रकरणी दिलासा मिळण्यासाठी व राजकीय भविष्यासाठी चौधरी हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेणार असल्याची टीका शहरातून होत आहे.
चौधरी रात्रभर पोलीस ठाण्यातच... सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड
मध्यवर्ती पोलिसांनी गंभीर गुन्हे राजेंद्र चौधरी यांच्यावर दाखल करूनही, अटक न करता १४ तासाच्या चौकशी नंतर सोडून दिले. त्यानंतर चौधरी यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने, पोलीस ठाण्यातच शिंदे यांच्या प्रवेशाचे ठरल्याची चर्चा शहरात रंगली. मात्र रात्रभर चौधरी पोलीस ठाण्यात होते. असे राठोड म्हणाले.