ठाणे : वर्तकनगर विभागाचे शिवसेना विभागप्रमुख जेरी डेव्हीड यांच्या कार्यालयातील चालक संतोष परुळेकर (३८) याने त्याचा सहकारी दीपक सालेकर (३७) याच्यावर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी परुळेकर याला वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली.वर्तकनगर, पोखरण रोड क्रमांक-२ येथे डेव्हीड यांचे कार्यालय असून याठिकाणी उपशाखाप्रमुख असलेला सालेकर हा पर्यवेक्षक तथा बॉडीगार्डचे, तर दुसरा उपशाखाप्रमुख संतोष हा चालकाचे काम करतो. कामाच्या श्रेयावरून या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. याशिवाय, आपल्या कामात दीपक हा हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप संतोषने केला आहे. याच वादाची ठिणगी ६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका क्षुल्लक वादातून उडाली. दोस्ती रेंटलकडून भीमनगरकडे जाणाºया रस्त्यावर वेदान्त हॉस्पिटलसमोर परुळेकर याने चाकू काढून संतोषच्या हातावर, कपाळावर आणि डोक्यावर सपासप वार केले. एक वार त्याने संतोषच्या डोक्याच्या मागील बाजूने केला. यात रक्तबंबाळ होऊन तो रस्त्यावर कोसळला. त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश जाधव आणि संतोष घाटेकर यांच्या पथकाने आरोपी संतोष याला ९ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास भीमनगर भागातून अटक केली. त्याला १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.विशेष म्हणजे दीपक यानेही ६ जानेवारी रोजी दुपारी संतोषला मारहाण केली होती. याच मारहाणीचा वचपा काढण्यासाठी संतोषने दीपकवर चाकूने वार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेना उपशाखाप्रमुखाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 4:41 AM