मीरारोड: मीरा भाईंदर महापालिकेने भर पावसात बाळंतीण व ७ दिवसाच्या तान्हुलीस खाजगी जागेतील झोपडे तोडून बेघर करण्याच्या कारवाई वरुन शिवसेना महिला आघाडीने भाईंदर पोलीस ठाण्यात भाजपा आमदार नरेंद्र मेहतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी मराठा समाजाने प्रभाग अधिकाऱ्याची कानउघडणी करत कारवाईची मागणी करत कुटुंबीयांना मदतीचा हात दिला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी बाळंतीण व बाळाच्या राहण्याचा तसेच संगोपनाचा खर्च शिवसेना उचलणार असल्याचे म्हटले आहे.
पावसात राहती घरं तोडू नयेत असे शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही आ. मेहतांनी सोमवारी सकाळी नगरसेवकांसह प्रभाग अधिकारी सुनिल यादव तसेच पोलीस, सुरक्षा रक्षक व कर्मचारी असा मोठा फौजफाटा घेऊन भर पावसात सकाळी साडे सातच्या सुमारास महेश्वरी भवन समोरील झोपड्यांवर तोडक कारवाई करायला लावली होती. या मार्गावर यंदा आ. मेहतांनी नवरात्री आयोजित केल्याचे आरोप झाले. पण मेहतांनी रहिवाशांच्या तक्रारीवरुन पालिकेने कारवाई पालिकेने केल्याचे सांगत नवरात्रीचा संबंध नसल्याचे म्हटले होते.
पदपथावरील झोपड्या हटवतानाच खाजगी जागेतील जुने पत्र्याचे राहते घरदेखील तोडण्यात आले. घरातील पूजा सुर्यवंशी या बाळंतीणीसह तिच्या ७ दिवसांच्या चिमुरडीस तसेच वृध्द नागरिक, दोन शाळकरी विद्यार्थिनींना बळजबरीने बाहेर काढून घरावर जेसीबी चालवण्यात आला होता. हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असल्याचा आरोप करत महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता.
आज मराठा समाजाचे मनोज राणे, विनोद जगताप यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन ९ वी व १० वीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींच्या शैक्षणिक साहित्यासाठी तसेच कुटुंबीयांना संसार उभारण्यासाठी मदत केली. याशिवाय प्रभाग अधिकारी यादव यांना जागेवर बोलावून अमानुष कारवाईबद्दल कानउघडणीदेखील केली.
शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक स्रेहल सावंत यांच्यासह सुप्रिया घोसाळकर अनेक महिला शिवसैनिकांनी भार्इंदर पोलीस ठाण्यात जाऊन आ. मेहतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. मेहतांनी केलेले हे कृत्य अमानुष असून त्यांच्यावर आणि महापौर डिंपल मेहता यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. बेटी बचाव, बेटी पढावच्या घोषणेचे काय झाले, महिलांचा सन्मान आता कुठे गेला, असे प्रश्न शिवसेनेने उपस्थित केले आहेत.
स्थानिक आमदार मेहताच्या सांगण्यावरून सकाळी साडे सात वाजता महापालिकेने केलेली कारवाई म्हणजे माणुसकीला कलंकित करणारी असल्याची टीका शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. महिलेच्या व तिच्या बाळाचा राहण्याचा, संगोपनाचा खर्च शिवसेना म्हणजे आपण स्वत: उचलणार असून त्या कुटुंबाला दत्तक घेत असल्याचे आ. सरनाईक यांनी सांगितले.