उल्हासनगर :शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका ज्योती माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी सहकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश घेतला. या प्रवेशाने ठाकरे गटाला धक्का बसला असून महापालिका निवडणुकी पूर्वी असे धक्के बसणार असल्याचे संकेत शिंदे गटाने दिले.
उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचे २५ नगरसेवक निवडून येऊन सत्ता काबीज केली होती. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर अर्धेअधिक नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याने, त्यांची राजकीय ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. २५ नगरसेवका पैकी माजी महापौर लिलाबाई अशान, राजेंद्र सिंग भुल्लर, महाराणी भुल्लर, पुष्पा बागुल, स्वप्नील बागुल, सुरेश जाधव, दिवंगत सुनील सुर्वे यांच्या धर्मपत्नी जयश्री सुर्वे, आकाश पाटील, कुलवंत सिंग सहातो, रमेश चव्हाण आदी १२ नगरसेवकांनी यापूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला. सोमवारी माजी नगरसेविका ज्योती माने यांनी समर्थकासह शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशाने शिंदे गटाची ताकद वाढल्याचे बोलले जात असलेतरी, बहुतांश शिवसेना कार्यकारणी पदाधिकारी व नगरसेवक ठाकरे गटा सोबत आहेत.
माजी नगरसेवक ज्योती माने, विभाग प्रमुख राजू पाटील, शांतीनगर येथील एक केबल चालक यांच्यासह माने समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रवेश केला. माने यांच्या प्रवेशाने पारंपरिक शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला संभाजी चौक परिसर शिंदे गटाच्या कब्जात आल्याचे बोलले जात आहे. माने यांच्या प्रवेश वेळी खासदार श्रीकांत शिंदे, गोपाळ लांडगे, शिंदे गटाचे शहरप्रमुख पदाचे दावेदार नाना बागुल, राजेंद्र सिंग भुल्लर, कुलवंत सिंग सहातो यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. ज्योती माने यांनी शिंदे गटात प्रवेश घेऊन, स्वतः राजकीय आत्महत्या केल्याची प्रतिक्रिया ठाकारे गटाकडून व्यक्त होत आहे.