उल्हासनगर: शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असून येत्या दोन दिवसात प्रवेश घेणार असल्याचे संकेत शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. मात्र त्यांचे लहान बंधू व कल्याण जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे मात्र शिवसेना ठाकरे गटाचे नेतृत्व सांभाळणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
उल्हासनगर शिवसेनेत गेली तीन दशकापासून बोडारे बंधूंचा दबदबा आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर चंद्रकांत बोडारे व धनंजय बोडारे यांनी शिवसेना ठाकरे गटात राहून कल्याण लोकसभा मतदारसंघ मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही दिवसांपासून कल्याण जिल्हाप्रमुखपदी असलेले चंद्रकांत बोडारे हें शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात होते. त्यांच्यावर पक्ष प्रवेशासाठी काही राजकीय नेत्यांचा दबाव असल्याची चर्चा रंगली. शनिवारी रात्री किंवा रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित बोडारे यांचा प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. या प्रवेशाचे शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनीही संकेत दिले आहे.
उल्हासनगर शिवसेना म्हणजे बोडारे बंधू अशी ओळख गेल्या तीन दशकापासून शहरात कायम आहे. बोडारे बंधू मधील मोठे बंधू चंद्रकांत बोडारे हे शिवसेना शिंदे गटात सामील होणार असलेतरी लहान बंधू व कल्याण जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे हे शिवसेना ठाकरे गटात राहणार आहेत. याबाबत चंद्रकांत बोडारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पक्ष प्रवेश करण्याची कबुली दिली. बोडारे शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेत असलेतरी बहुतांश स्थानिक पक्ष पदाधिकारी व शिवसैनिकांनी मात्र ठाकरे गटात राहणार असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण लोकसभेचे नेतृत्व धनंजय बोडारे यांच्याकडे येणार असून त्यांचे लोकसभा उमेदवार म्हणून पक्षाकडून चाचपणी सुरू केली असल्याची चर्चाही रंगली आहे.