उल्हासनगर : महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सोमवारी दुपारी ३ ते ५ दरम्यान अर्ज भरण्यात येणार असून त्यावेळी शहरातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. खुल्या वर्गासाठी महापौरपद असल्याने इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली असून शिवसेनेने महापौरपद मिळविण्यासाठी कंबर कसली आहे.शिवसेना, भाजप, साई व राष्ट्रवादी पक्षांतून अनेक इच्छुक रांगेत आहेत. मात्र, राज्यातील सत्तांतरावर शहरातील राजकीय समीकरणे अवलंबून आहे. २२ नोव्हेंबर रोजी महापौरपदाची निवडणूक असून सोमवार, १८ नोव्हेंबरला महापौरपदासाठी अर्ज भरण्याची मुदत आहे. शिवसेनेकडून शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, रमेश चव्हाण, माजी महापौर राजश्री चौधरी, लीलाबाई अशांत, तर भाजपकडून गटनेते जमनुदास पुरस्वानी, मीना आयलानी, जया माखिजा, साई पक्षाकडून जीवन इदनानी आदी इच्छुक आहेत. शिवसेना, ओमी टीम, रिपाइं, राष्ट्रवादी, भारिप, काँग्रेस, पीआरपी एकत्र येण्याची शक्यता आहे.महापालिका निवडणुकीत भाजप व ओमी टीमची आघाडी होऊन ओमी समर्थकांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत ओमी टीमच्या महापौर पंचम कलानी यांना उमेदवारी न दिल्याने, कलानी कुटुंब नाराज आहे.भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष व आमदार कुमार आयलानी यांनी महापालिकेत भाजपचे एकूण ३१ नगरसेवक असल्याचे सांगून ओमी टीम भाजप आघाडीसोबत असल्याचे सांगितले. तर, ओमी कलानी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.प्रत्यक्षात ओमी टीम शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा शहरात सुरू असून शिवसेनेने तसे संकेत दिले आहेत. साई पक्षाचे जीवन इदनानी यांनीही महापौरपदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे. मित्रपक्ष भाजपसोबत बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. चौधरी यांनी महापौर शिवसेनेचा होणार असल्याचे पुन्हा एकदा सांगितले.>शिवसेना झाली आक्रमक : महापालिकेत शिवसेनेचे एकूण २५ नगरसेवक असून बहुमतासाठी ४० नगरसेवकांची गरज आहे. काँॅग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं, भारिप, पीआरपी पक्षाचे एकूण १० नगरसेवक असून यापूर्वीच्या महापौर निवडणुकीचा इतिहास बघता, यावेळीही साई पक्षाचे अर्धेअधिक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. तसेच भाजपतील ओमी समर्थक नगरसेवक शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचेही समजते.
उल्हासनगरात महापौरपदासाठी शिवसेनेने कसली कंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 1:08 AM