Maharashtra Politics: आगामी मुंबईसह ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. लवकरच निवडणुका जाहीर होणार असल्याचे कयास बांधले जात आहेत. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या गेलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरे यांचा एक बॅनर लावण्यात आला असून, या बॅनरची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या ठाणे महापालिकेतील जवळपास सर्वच माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनरल लावण्यात आले आहेत. या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र योद्धा असा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरवर, न झुकणारा न वाकणारा दिल्लीश्वरांच्या अन्यायी महाशक्तिला महाराष्ट्राच्या स्वाभिमानी वृत्तीने आव्हान देणारा बाळासाहेबांच्या संघर्षमय विचाराराच खरा वारसदार उद्धव ठाकरे, असा मजकूर या बॅनरवर देण्यात आला आहे.
ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात तणाव
ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागले असताना, दुसरीकडे डोंबिवलीत ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. शिंदे गटाने डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखा ताब्यात घेतली आहे. यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. काही महिला पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"