सदानंद नाईक
उल्हासनगर : लालचक्की चौकात मंगळवारी माँ मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिंदे गटातील पदाधिकारी अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी राजेंद्र सिंग भुल्लर यांनी शिवसेना विभाग प्रमुख राजू माने यांच्यासह इतरांनी शिंदे गटात प्रवेश घेतल्याचे पत्रकारांना सांगितल्यावरून शिवसेना व शिंदे गट आमने-सामने येऊन आरोप प्रत्यारोप सुरू झाले.
उल्हासनगर महापालिकेवर भाजप सोबत सत्ता स्थापनेचा दावा शिवसेना शिंदे गटाने यापूर्वीच केला. मंगळवारी माँ मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिना निमित्त कॅम्प नं-४ लालचक्की चौकात अभिवादन ठेवण्यात आले. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख संदीप गायकवाड, विभागप्रमुख राजू माने, शिवसेनेचे पदाधिकारी व माजी नगरसेवक अभिवादानासाठी एकत्र आले होते. तसेच शिवसेने प्रमाणे शिंदे गटाचे गोपाळ लांडगे, नाना बागुल, अरुण अशान, राजेंद्र सिंग भुल्लर यांच्या समवेत शिंदे गटाचे समर्थक एकत्र येऊन अभिवादन केले. यावेळी राजेंद्र सिंग भुल्लर यांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख राजू माने, राजू शिंदे व विनोद हिंगे यांनी शिंदे गटात प्रवेश घेतल्याचे पत्रकारांना सांगितले.
शिवसेनेच्या विभाग प्रमुखासह इतरांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे, सोशल मीडियावर व्हायरल झाले. पक्ष प्रवेशाचे खंडन करण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी विभागप्रमुख राजू माने, शाखा प्रमुख राजू शिंदे व विनोद हिंगे यांच्या समवेत बसून यांनी प्रवेश घेतला नसल्याचे सांगितले. तसेच शिंदे गटाने मनाविरोधात व बळजबरीने प्रवेश देऊ नये. असे सुनावले. यानंतर लागलीच शिंदे गटाचे अरुण अशान यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी उंटावरून शेळ्या न हाकता, आपला पक्ष मोठा करावा. असे सुनावले. शिंदे गटात कोणालाही बळजबरीने प्रवेश दिला जात नसून नागरिक व इतर पक्षाचे पदाधिकारी प्रवेश घेत असल्याचे सांगितले.
शहरात शिवसेना मजबूत... राजेंद्र चौधरी
ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेला गळती लागली असतांना, शहरात शिवसेना मजबूत स्थितीत आहे. शिवसेनेचे काही कट्टर माजी नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. इतर जण उपरे व अनेक पक्ष फिरून आलेले आहेत. जुने जाणते नेते व पदाधिकारी शिवसेने सोबत असून पक्षाला आदीचे वैभव प्राप्त करून देणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.